1951 मध्ये अपहरण झालेला मुलगा 70 वर्षांनी घरी परतला, पण तो क्षण पाहायला आईच नव्हती; भाऊ मिठी मारुन रडला अन् महिन्याभरात...
21 फेब्रुवारी 1951 रोजी लुईस अरमांडो अल्बिनो यांचं अपहरण झालं होतं. भावासोबत खेळत असताना त्याला मिठाईचं आमिष दाखवत एका महिलेने त्यांना उचलून नेलं होतं.
अपहरण झालेला मुलगा तब्बल 70 वर्षांनी जिवंत सापडल्याची एक आश्चर्यकारक घटना अमेरिकेत घडली आहे. लुईस अरमांडो अल्बिनो 21 फेब्रुवारी 1951 रोजी कॅलिफोर्नियातील वेस्ट ऑकलंड येथील एका उद्यानातून बेपत्ता झाला होता. आपला 10 वर्षांचा भाऊ रॉजरसोबत खेळत असताना एका महिलेने मिठाईचं आमिष दाखवत त्याचं अपहरण केलं होतं. कित्येक वर्षांपासून कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. मात्र त्याचा ठावठिकाणा सापडत नव्हता. पण अखेर यावर्षी डीएनए चाचणीतून कुटुंबांच्या प्रयत्नांना यश आलं.
मर्क्युरी न्यूजने प्रथम हे वृत्त दिलं. अल्बिनोची भाची अलिडा ॲलेक्विनने आपल्या काकांना शोधण्यासाठी प्रयत्न सुरु केली. डीएनए चाचणी, वृत्तपत्रांतील बातम्या तसंच ओकलंड पोलीस विभाग, एफबीआय आणि न्याय विभागाची मदत घेत 63 वर्षीय ॲलेक्विनने तिच्या काकांचा माग काढला. लुईस अल्बिनो आता एक निवृत्त अग्निशामक जवान आणि मरीन कॉर्प्सचा अधिकारी आहे, त्याने व्हिएतनाममध्ये कर्तव्य निभावलं आहे.
जूनमध्ये अल्बिनो, आता 79 वर्षांचे झाले. आपल्या कुटुंबीयांना भेटताना ते भावूक झाले होते. यात त्यांचा मोठे बंधू रॉजर यांचाही समावेश होता ज्यांचा गेल्या महिन्यात कॅन्सरमुळे मृत्यू झाला. रॉजर यांच्या निधनापूर्वी दोन्ही भावांचं भावनिक मिलन झालं. दोघांनी एकमेकांना घट्ट आणि दीर्घ मिठी मारली. ते एकत्र बसून बराच वेळ बोलत होते असं अलिडा ॲलेक्विनने सांगितलं.
2020 मध्ये शोध सुरु केल्यानंतर त्यांनी अनौपचारिकपणे ऑनलाइन डीएनए चाचणी घेतली. अल्बिनो यांच्याशी निकाल 22 टक्के जुळल्यानंतर त्यांनी त्यांचा कौटुंबिक इतिहास तपासला. आपल्या मुलींसह त्यांनी जुनी कात्रणं, ग्रंथालय यांच्या मदतीने अल्बिनो यांचे जुने फोटो मिळवले असता त्यांचा संशय़ खऱा ठरला. अनेक दशकांपासून गूढ उकलण्यात त्यांचा निर्धार महत्त्वाचा ठरला.
अल्बिनो यांना त्यांच्या अपहरणाचे आणि पूर्व किनारपट्टीवरील प्रवासातील काही भाग आठवतो. पण त्यावेळी कोणीही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत नव्हतं. आता मात्र त्यांना तो प्रवास खासगी ठेवायचा आहे. दुर्दैवाने 2005 मध्ये वयाच्या 92 व्या वर्षी त्यांच्या आईचं निधन झालं. मुलाचा शोध लागल्याचा तो क्षण पाहण्यासाठी त्या दुर्दैवाने जिवंत नव्हत्या.