South Korea Plane Crash: दक्षिण कोरियातील नागरिकांसाठी रविवारची पहाट भयानक घटनेने सुरु झाली, 181 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा लँडिंगनंतर स्फोट झाला. या दुर्घटनेत 179 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भिती आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच प्रवाशांच्या नातेवाईक, मित्रांनी मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर गर्दी केली होती. आपले प्रियजन या दुर्घटनेतून वाचले असावेत अशी भोळी आशा उराशी बाळगत सर्वजण विमानतळाबाहेर वाट पाहत होते. यामधील एका प्रवाशाच्या कुटुंबाने आपल्याला दुर्घटनेआधी त्यांनी मेसेज पाठवल्याचं सांगितलं. पक्षी विमानाच्या पंख्यात अडकल्याचं त्यांनी मेसेजमध्ये लिहिलं होतं. यावेळी आणखी एक मेसेज त्यांच्या मोबाईलवर आला होता, ज्यामध्ये 'मी माझे अखेरचे शब्द बोलू का?' असं लिहिलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक स्थानिकांनी जेटच्या इंजिनमध्ये ज्वाला पाहिल्या आणि घटनेदरम्यान अनेक स्फोट ऐकले, असं दक्षिण कोरियाच्या योनहाप वृत्तसंस्थेने सांगितलं आहे. "मी विमान उतरताना पाहिले आणि मला वाटले की ते लँड होणार आहे. पण मला तेव्हा प्रकाशाचा एक बिंदू दिसला... त्यानंतर हवेत धुर दिसला आणि त्यानंतर मला स्फोटांची मालिका ऐकू आली," असं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे. विमानतळापासून सुमारे 4.5 किलोमीटर अंतरावर आपण फेरफटका मारत असल्याचं त्याने सांगितलं आहे. 


अपघाताच्या सुमारे पाच मिनिटांपूर्वी दोनदा "मेटल स्क्रॅपिंग" चा आवाज ऐकल्याचे आणखी एका साक्षीदाराने सांगितलं, असं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे. त्यानंतर, त्या माणसाने, लँडिंग करण्यात अयशस्वी झाल्यानंतर विमान झुकताना पाहिले. यानंतर काही सेकंदात एक स्फोट ऐकू आला आणि आकाशात काळा धूर उडताना दिसला.



जेजू एअर विमान, बोइंग 737-800 विमान, बँकॉकहून मुआनला जात होते. सकाळी 9 वाजल्यानंतर काही वेळातच विमानाने लँडिंगचा प्रयत्न केला पण ते कुंपणावर आदळले. व्बिडीओत विमान धावपट्टीवरून घसरत, क्रॅश होताना आणि लगेचच आगीच्या ज्वालांनी घेरलेलं दिसत आहे. काही सेकंदातच आकाशात प्रचंड काळा धूर पसरला होता.


व्हिडिओंमध्ये, विमानाने 'बेली लँडिंग' दिसते (त्याचे लँडिंग गियर पूर्णपणे वापर न करता) करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे. अधिकारी प्राण्यांच्या धडकेमुळे किंवा हवामानाची स्थिती यापैकी नेमकी कोणती गोष्ट कारणीभूत ठरली याचा तपास करत आहेत. 


अपघातानंतर दोन तासांहून अधिक काळ लोटला तरी शेपटीच्या भागातून धूर निघत होता आणि विमानाच्या विखुरलेल्या तुकड्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते. प्रवाशांचे कपडे, सामान आणि पाण्याच्या बाटल्या सर्व ठिकाणी विखुरलेल्या होत्या. यापैकी अनेक वस्तू रक्ताने माखल्या होत्या. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे, जे क्रू मेंबर असण्याची शक्यता आहे. दक्षिण कोरियाच्या न्यूज1 एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, विमानातील सर्वात वयस्कर व्यक्ती 78 वर्षांची व्यक्ती होती, तर सर्वात लहान तीन वर्षांचे बाळ होते.


जेजू एअरने जारी केलं निवेदन


जेजू एअरने अपघाताबद्दल 'विनम्रपणे माफी मागतो' असं निवेदन जारी केलं आहे. "आम्ही या अपघाताला प्रतिसाद देण्यासाठी आमचं सर्व प्राबल्य वापरु. चिंता निर्माण केल्याबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत," असं एअरलाइनने त्यांच्या वेबसाइटवर दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.


विमान कंपनीचे सीईओ किम ई-बाय यांनी एका दूरचित्रवाणी संबोधनादरम्यान सांगितलं की, अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी, विमानाची अपघाताची कोणतीही नोंद नाही आणि खराबीची कोणतीही प्रारंभिक चिन्हे नाहीत. ते म्हणाले, "विमान कंपनी तपासकर्त्यांना सहकार्य करेल आणि शोकग्रस्तांना पाठिंबा देईल".


दम्यान मुआन विमानतळावरील सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.