अमेरिकेतील टेक्सास येथे कारने दिलेल्या धडकेत एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. कारने धडक दिल्यानंतर तरुण जवळपास 30 फूट दूर लांब फेकला गेला. धडक इतकी भीषण होती, की तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला. दुर्दैवी बाब म्हणजे, तरुण आपल्या पहिल्या डेटवर आला होता. प्रेयसी भेटल्यानंतर दोघेही रेस्तराँमध्ये जेवायला गेले होते. तेथून बाहेर पडल्यानंतर दोघेही रस्त्यावर फेरफटका मारत असताना 160 किमी ताशी वेगाने आलेल्या Porsche कारने त्याला धडक दिली. पोलिसांनी कार चालवणाऱ्या महिलेला अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालवणाऱ्या 32 वर्षीय महिलेचं नाव क्रिस्टिना चेम्बर्स आहे. कार चालवत असताना ती दारुच्या नशेत होती. दारुच्या नशेत क्रिस्टिना तब्बल 160 किमी ताशी वेगाने कार चालवत होती. महिलेच्या या बेदरकार वेगाने जोसेफ मॅकमुलिनचा मृत्यू झाल आहे. दरम्यान, या अपघातातून त्याची प्रेयसी मात्र बचावली आहे. 


मिरर युकेच्या वृत्तानुसार, जोसेफ 19 एप्रिलला आपल्या प्रेयसीसह पहिल्या डेटवर गेला होता. फुटपथावर आपल्या प्रेयसीसह फिरत असताना ताशी 160किमी वेगाना धावणाऱ्या कारने त्याला धडक दिली. यानंतर तो 30 फूट दूर फेकला गेला आणि जागीच ठार झाला. 


महिला चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. यानंतर तिची कार फुटपाथवर चढली आणि एका खांबाला धडक दिली. या अपघातात अन्य तीन लोकही जखमी झाले आहेत. पोलिसांना रात्री 2 वाजून 25 मिनिटांनी घटनास्थळी बोलावण्यात आलं होतं. पोलिसांनी जोसेफचा मृतदेह रुग्णालयात नेला. 


हे प्रकरण सध्या कोर्टात आहे. क्रिस्टिनाच्या शरीरात प्रमाणापेक्षा चारपट अधिक मद्य आढळल्याचं कोर्टात सांगण्यात आलं. यानंतर तिचा चालक परवाना रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, क्रिस्टिनाने मात्र आपण एक ते दोनच बिअरच्या बाटल्या प्यायल्या होत्या असा दावा केला. तसंच अपघाताला खराब रस्ता जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. खराब रस्त्यामुळे नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला असं तिचं म्हणणं आहे. कोर्टाने अद्याप याप्रकरणी निर्णय सुनावलेला नाही.