अभ्यास न केल्याने किंवा मस्ती केल्याने शिक्षक विद्यार्थ्यांना अनेकदा फटके लगावत असतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार देणं तशी सर्वसामान्य बाब आहे. पण अनेकदा हा मार मुलांना सहन होण्यापलीकडचा असतो. यामुळे पालकही शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर हात उचलल्यास तक्रार करतात. दरम्यान, चीनमध्ये एका शिक्षकाने 9 वर्षाच्या विद्यार्थिनीला इतकी बेदम मारहाण केली की ती मुलगी रुग्णालयात जीवन, मृत्यूशी झुंज देत आहे. शिक्षकाने केलेल्या मारहाणीत मुलीचं डोकं फुटून जवळपास मेंदू बाहेर आल्याचं तिच्या आईने सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनमध्ये एका 9 वर्षाच्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिच्या डोक्याला इतक्या जखमा झाल्या आहेत की तुम्ही विचारही करु शकत नाही. शिक्षकाने तिला कथितपणे लोखंडाच्या पट्टीने मारहाण केली. शिक्षकाने तिच्या डोक्यावर इतक्या वेळा पट्टी मारली की डोकं फुटून तिचा मेंदू बाहेर आला. चीनच्या हुनान प्रांतात ही घटना घडली आहे. 


बोकाई मिक्सिहू प्रायमरी स्कूलमधील शिक्षकाला स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. त्याने मुलीच्या डोक्यावर इतक्या जोराने मारलं की 5 सेंमी खोल जखम झाली आहे. दरम्यान, मुलीला इतकी मारहाण का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. 


सोंग माउमिंग असं या शिक्षकाचं नाव आहे. मुलीची प्रकृती सध्या खराब आहे. मुलगी जखमी झाल्यानंतर तिला शाळेत उपस्थित डॉक्टरकडेच नेण्यात आलं होतं. शाळेने मात्र ही फार छोटी जखम असून, फक्त टाके देण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. पण मुलीची प्रकृती खराब असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या कवटीला फ्रॅक्चर आहे. तिचं हाडं तुटली असून, तात्काळ सर्जरी करावी लागली. मुलीवर अनेक तास ऑपरेशन सुरु होतं. सुरुवातीला डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यास नकार दिला होता. याचं कारण तिच्या आई-वडिलांची मंजुरी आवश्यक होती. 


यानंतर मुलीच्या आई-वडिलांना माहिती देण्यात आली. मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, शाळेतील डॉक्टर तिच्यासोबत होता. तो रुग्णालयातील डॉक्टरांना फक्त टाके मारा असं सांगत होते. पण मुलीची तपासणी केली असता फ्रॅक्चर होतं. मुलगी अद्यापही आयसीयुत आहे असं मुलीच्या वडिलांनी सांगितलं आहे. 


शाळेकडून कुटुंबाशी कोणताही संपर्क साधण्यात आलेला नाही. त्यांनी सांगितलं की, "शाळेकडून आम्हाला अद्याप कोणतंही उत्तर मिळालेलं नाही. मला माहिती नाही आता नेमकं काय करायचं आहे. पण माझ्या मुलीचा जीव वाचला जावा इतकीच प्रार्थना आहे".