मॉस्को : पश्चिम आशियातील हजारो स्थलांतरित बेलारूस ओलांडून पोलंडच्या सीमेवर पोहोचल्याने युरोपमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण होत आहे. त्यांना रोखण्यासाठी पोलंडने हजारो सैनिक सीमेवर तैनात केले आहेत. त्याचवेळी आपला मित्र बेलारूसच्या समर्थनार्थ आता रशियाही (Russia) मैदानात उतरला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलंड-बेलारूस (Poland-Belarus conflict) यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान रशियाने आपले शेकडो सैन्य बेलारूसला पाठवले आहे. हे सैनिक तेथे बेलारशियन सैन्यासोबत संयुक्त सरावात सहभागी होतील. रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, संयुक्त सरावात भाग घेण्यासाठी रशियाचे पॅराट्रूपर्स जड मालवाहू विमानातून बेलारूसच्या गोडनो भागात उतरले.


बेलारूसच्या लष्कराने सांगितले की, या संयुक्त युद्ध सरावाचा उद्देश 'बेलारूस सीमेवर' बदललेली परिस्थिती पाहता तात्काळ प्रत्युत्तराच्या तयारीची चाचणी घेणे आहे. हवाई संरक्षण, हेलिकॉप्टर गनशिप, बेलारूसचे पॅरा कमांडोसह शेकडो सैनिक या सरावात सहभागी होणार आहेत. रशियाने या आठवड्यात आपले अण्वस्त्र-सक्षम बॉम्बर बेलारूसला गस्त मोहिमेवर पाठवले.


युरोपियन युनियनने (EU) बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्यावर हुकूमशाहीचा आरोप करत त्यांच्यावर अनेक आर्थिक निर्बंध लादले आहेत. युरोपियन युनियनचा आरोप आहे की बेलारूसने आर्थिक निर्बंधांचा बदला घेण्यासाठी सीरिया, इराक आणि अफगाणिस्तानसह पश्चिम आशियातील हजारो लोकांना जाणूनबुजून आपल्या सीमेवर प्रवेश करण्यास परवानगी दिली. यानंतर, त्या लोकांना सुरक्षितपणे पोलंड सीमेवर पोहोचवण्यात आले.


पोलंडच्या सीमेवर हजारो निर्वासित अडकले


बेलारूसने EU द्वारे हे आरोप स्पष्टपणे नाकारले आहेत. पोलंडमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हजारो स्थलांतरितांना रोखण्यासही नकार दिला आहे. यानंतर पोलंडने हजारो स्थलांतरितांना त्यांच्या देशात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी तेथे मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले आहे. पोलंडच्या या कारवाईला युरोपीय संघानेही पाठिंबा दिला आहे. यानंतर बेलारूसनेही आपल्या सीमेवर सैनिकांची गर्दी वाढवली आहे. या वातावरणात बेलारूसच्या समर्थनार्थ रशियन सैन्याच्या आगमनामुळे युरोपमध्ये युद्धाची भीती तीव्र झाली आहे.