काबूल : तालिबान्यांनी अफगाणिस्तानात ताब्यात घेतल्यानंतर तेथील परिस्थिती दिवसेंदिवस खूपच बिकट होत चालली आहे. सध्या कबूलमधून अशा बातम्या समोर येत आहेत की, काबूलच्या रस्त्यांवर गोळीबारांचा आवाज ऐकू आला. हा गोळीबार आफगाणिस्तानातील नागरीकांसाठी करण्यात आला होता. परंतु यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही कारण हा गोळीबार लोकांना घाबरवण्यासाठी केला गेला होता. कारण अफगाणिस्तानातील महिला आणि पुरुष रस्त्यावर उतरले होते आणि ते रस्त्यावर विरोधी प्रदर्शन करत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रदर्शनात ते आपल्या हक्कांच्या मागणीसह पाकिस्तान विरोधी नारे लावत असल्याचे पाहायला मिळाले. ज्यामुळे या गर्दीला कमी करण्यासाठी हा गोळीबार करण्यात आला.


या प्रदर्शनात आंदोलकांनी 'अल्लाहू अकबर', 'आम्हाला एक स्वशासित देश हवा आहे', 'आम्हाला पाकिस्तानची कठपुतळी सरकार नको', 'पाकिस्तान अफगाणिस्तान सोडा' अशा घोषणा दिल्या आहेत.


हे आंदोलक राष्ट्रपती भवनात पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे तालिबान्यांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला होता. मीडिया अहवालानुसार हा मोर्चा शांततापूर्ण सुरू असला तरी तालिबान सदस्यांनी आंदोलकांना आणि इतर पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.


काबुलमध्ये होणऱ्या या आंदोलनामध्ये  सुमारे 1 हजार पुरुष आणि महिलांनी समावेश घेतला आणि ते पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानने तालिबानला पंजशीरमध्ये पाठिंबा दिला आहे. तसेच या आंदोलनात महिलांच्या अधिकारांबद्दलही बोलले जात आहेत.


अलीकडच्या काळात काबूलमध्ये अनेक निदर्शने


काही लोकांनी अफगाणिस्तानचा झेंडा हटवण्याऱ्यांचा निषेध केला आहे, तसेच महिलांनी विविध शहरांमध्ये त्यांच्या हक्कांसाठी निदर्शनेही केली आहेत.


सोमवारी, महिलांच्या एका गटाने बाल्ख प्रांताची राजधानी मजार-ए-शरीफ येथे त्यांच्या हक्कांची आणि स्वातंत्र्यांची मागणी करत एक रॅली काढली. निदर्शकांनी बल्ख येथील प्रांतीय प्रशासनाच्या इमारतींसमोर ही निदर्शने केली आणि तालिबानकडे त्यांच्या सरकारमधील अफगाण महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी केली.



मंगळवारी काबूलच्या रस्त्यावर उतरलेले आंदोलक पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या प्रमुखांच्या काबूल भेटीचा मुद्दाही उपस्थित करत होते.


आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद शनिवारी अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नांमध्ये काबूलला गेले होते. पाकिस्तानने तालिबान्यांना लष्करी मदत पुरवल्याचा अफगाणिस्तानातील लोकांचा आरोप आहे. मात्र, पाकिस्तानने हे आरोप नेहमीच फेटाळले आहेत.