नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून भारताने अनुच्छेद ३७० आणि ३५ ए हटवल्यानंतर पाकिस्तानने आणखी एक पाऊल उचललं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरु असलेली समझौता एक्स्प्रेस रोखण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. पाकिस्तानने आपल्या ट्रेन ड्रायव्हर आणि गार्डला समझौता एक्स्प्रेससोबत पाठवायला नकार दिला आङे. याबद्दल पाकिस्तानने अटारी रेल्वे स्टेशनवर सूचना पाठवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आम्ही सध्या समझौता एक्स्प्रेसची सेवा थांबवली आहे, त्यामुळे भारताने आपला ड्रायव्हर, क्रु मेंबर आणि समझौता एक्स्प्रेस पाकिस्तानमधून घेऊन जावी', असा संदेश पाकिस्तानने दिला आहे. यानंतर भारत आपलं इंजिन आणि क्रू ट्रेन परत आणण्यासाठी पाठवणार आहे. पाकिस्तानने हे पाऊल उचलल्यामुळे अटारी बॉर्डरवर शेकडो यात्री अडकले आहेत.


अटारी आंतरराष्ट्रीय रेल्वे स्टेशनचे सुप्रिटेंडंट अरविंद कुमार गुप्ता म्हणाले, 'आज पाकिस्तानमधून समझौता एक्स्प्रेस भारतात येणार होती, पण तिकडून संदेश आला की भारतीय रेल्वेने आपला ड्रायव्हर आणि क्रू मेंबर पाठवून समझौता एक्स्प्रेस घेऊन जावी. यासाठी पाकिस्तानने सुरक्षेच्या कारणाचा दाखला दिला.'


पाकिस्तानने समझौता एक्स्प्रेस रोखल्यानंतर आता भारतीय रेल्वे ड्रायव्हर, गार्ड ज्यांच्याकडे विजा आहे, त्यांना समझौता एक्स्प्रेस परत आणण्यासाठी पाठवणार आहे, अशी माहिती अरविंद कुमार गुप्ता यांनी दिली.


भारताने काश्मीरमधून अनुच्छेद ३७० आणि ३५ ए हटवल्यानंतर पाकिस्तान खवळला आहे. हा मुद्दा संयुक्त राष्ट्रांमध्ये न्यायची धमकी पाकिस्तानने दिली. तसंच पाकिस्तानने भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध स्थगित केले. भारताचे पाकिस्तानमधील उच्चायुक्त अजय बिसारिया यांनाही पाकिस्तान सोडावं, असं सांगण्यात आलं आहे. गुरुवारी पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाली. या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. या बैठकीचे अध्यक्ष पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान होते. या बैठकीला पाकिस्तानच्या सैन्याचे नेतृत्व करणारे अधिकारीही उपस्थित होते.


पाकिस्तानचे राजदूत दिल्लीमध्ये राहणार नाहीत, असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. याचबरोबर पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंधही तोडले आहेत. तसंच पाकिस्तानने त्यांचे ९ पैकी ३ एयरस्पेस भारतासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला.