मुंबई : असं म्हणतात देव प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही किंवा प्रत्येकासोबतच राहू शकत नाही. म्हणूनच त्याने आई बनवली. आई, या दोन शब्दांचं महत्त्वं अनन्यसाधारण असते. कारण तिचं मातृत्त्व हे फक्त आपल्या बाळासाठीच नव्हे तर, इतरांसाठीही असतं. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून अशीच एक एअरहॉस्टेस आई सर्वांची मनं जिंकत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिलिपिन्स येथील डॉमेस्टिक विमानप्रवासादरम्यान, एका एअरहॉस्टेसने विमानात असणाऱ्या अनोळखी प्रवाशाच्या मुलीला स्तनपान करत मातृत्वाचा स्तर खऱ्या अर्थाने उंचावला आहे. 


पॅट्रीशा ओरगॅनो असं त्या एअरहॉस्टेसचं नाव असून, एक फेसबुक पोस्ट लिहित तिनेच आपला हा अनुभव सर्वांसमक्ष मांडला. 


मातृत्व दिल्याबद्दल तिने आपल्या पोस्टमधून देवाचे मनापासून आभारही मानले आहेत.

फिलिपिन्स एअरलाईन्सच्या त्या विमानाने उड्डाण भरताच पॅट्रीशाच्या कानांवर बाळ रडत असल्याचा आवाज पडला. त्या आवाजामुळे इतर प्रवाशांना त्रास होत असल्याचं तिने पाहिलं आणि बाळाच्या आईला स्तनपान करण्याचा सल्ला दिला. जेणेकरुन ते बाळ शांत होईल.


पण, रडणाऱ्या चिमुरडीला पाजण्यासाठी आणलेलं दूध संपलं असल्याचं तिच्या आईने सांगितलं. विमानातही लहान मुलांना पाजण्यासाठीचं दूध नसल्याचं पॅट्रीशाच्या लक्षात आलं ही बाब तिच्या मनाला चटका लावून गेली. अखेर तिने स्वत:च त्या अनोळखी प्रवाशाच्या मुलीला स्तनपान करण्याचा निर्णय घेतला.


सहकाराऱ्यांच्या सहाय्याने पॅट्रीशाने त्या रडणाऱ्या मुलीला गॅलरीच्या भागात नेत तिला स्तनपान केलं ज्यानंतर तिचं रडणं थांबलं आणि ती चिमुरडी झोपी गेली. मुलीच्या आईने पॅट्रीशाचे सहृदय आभार मानले. 



एक आई म्हणून त्यावेळी रडणाऱ्या मुलीच्या आईच्या मनात किती घालमेल झाली असेल याची आपल्याला कल्पना असल्याचंही पॅट्रीशा आपल्या पोस्टमध्ये म्हणाली. 

'मिरर युके'मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार पॅट्रीशा ही स्वत: ९ महिन्यांच्या बाळाची आई आहे. त्यामुळे एक आई म्हणून तिने खऱ्या अर्थाने सर्वांचीच मनं जिंकत इतरांपुढे आदर्श ठेवला अशाच प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत.