भारत-चीनमध्ये तणावपूर्ण वातावरण, संपूर्ण LAC वर अलर्ट
भारत-चीन तणाव वाढला.
नवी दिल्ली : लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव आता शिगेला पोहोचला आहे. भारतीय लष्कराने माहिती दिली की, गालवान खोऱ्या जवळ चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत कमांडिंग ऑफिसरसह 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. या संघर्षात चीनचं ही मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.
चीन सीमेवर शहीद झालेल्या 20 जवानांची नावे आज सैन्य जाहीर करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चीनकडून सीमेच्या परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. संभाषणातून कोणताही तोडगा निघालेला नाही. आता केवळ लडाखच नाही तर संपूर्ण एलएसीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.
लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल (LAC)वर विश्वासघात करत चीनी सैनिकांनी भारतीय जवांनावर हल्ला केल्यानंतर आता चीन चर्चेने तणाव कमी करण्याची गोष्ट बोलू लागला आहे. चीनमधीले एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, चीनी सैनिकांचे प्रवक्त्याने म्हटलं आहे की, 'भारताने त्यांच्या सैनिकांना सख्तीने रोखलं पाहिजे. चर्चेच्या मार्गावर आलं पाहिजे.'
भारताचे काही जवान चिनी सैन्याने माघार घेण्यासाठी केलेल्या संमतीवर चर्चा करण्यासाठी गेले होते. परंतु तेथे भारतीय सैनिकांची चीनकडून फसवणूक झाली. चिनी सैनिकांनी दगड, काटेरी तार आणि खिळे लावलेल्या काठ्यांनी जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यामुळे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू आणि दोन सैनिक जागीच शहीद झाले, तर बरेच सैनिक जखमी झाले.
जेथे ही झडप झाली त्या ठिकाणाहून वेगवान श्योक नदी वाहते. अनेक सैनिक नदीत वाहून गेल्याची माहिती आहे. या भागात तापमान कमी असल्याने अनेक जखमी सैनिक उपचाराआधीच शहीद झाले.