अलेक्साचा दहा वर्षाच्या मुलीसोबत जीवघेणा खेळ
अखेर! Amazon वर माफी मागण्याची नामुष्की
न्यूयॉर्क : Amazon चे डिजिटल व्हॉईस असिस्टंट अलेक्सा सध्या खूप चर्चेत आहे. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर झटकन शोधायचे असेल तर त्याचं उत्तर आहे अलेक्सा. लहान मुलांमध्ये या अलेक्साचं खास आकर्षण आहे. परंतु, एका दहा वर्षाच्या मुलीसोबत जीवघेणा खेळ खेळण्याचा प्रकार अलेक्साच्या चांगलाच अंगलट आला आहे.
या घटनेत अमेरिकेत राहणाऱ्या एका १० वर्षांच्या मुलीने अलेक्साला To Do Challange असं विचारलं. तेव्हा, अलेक्सानं तिला जे काही करायला सांगितलं त्यामुळे कुणाही पालकाच्या मनात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.
या चॅलेंजमध्ये अलेक्साने त्या मुलीला आधी मोबाईल चार्जर अर्ध्या प्लगमध्ये ठेवा आणि नंतर मध्ये एक नाणे टाकून स्पर्श करा असं सांगितलं. अलेक्साने त्या मुलीला जेव्हा हे Challange दिलं तेव्हा त्या मुलीची आई जवळच होती. जर त्या मुलीने हे Challange स्वीकारलं असतं तर विजेचा जोरदार धक्का बसून त्या मुलीच्या प्राणावर बेतलं असतं.
सुदैवाने तेव्हा जवळच्या असणाऱ्या त्या मुलीच्या आईने लगेच 'नो अलेक्सा' म्हटले आणि त्या मुलीनेही ते Challange स्वीकारलं नाही. मात्र, या Challange मुळे मुलीच्या आईला प्रचंड धक्का बसला. तिने या घटनेची माहिती ट्विटरवर दिली. Amazon ला या घटनेची माहिती मिळाली तेव्हा कंपनीने लगेच अलेक्सामध्ये अपडेट केलं. तसेच, झाल्या घटनेबद्दल लगेच माफीही मागितली.