न्यूयॉर्क : चीनची ई-कॉमर्स कंपनी 'अलीबाबा'चे सहसंस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष जॅक मा यांनी निवृत्तीची घोषणा केलीय. येत्या सोमवारी ते निवृत्ती स्वीकारणार आहे. यानंतर शिक्षण क्षेत्रात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केलीय. 'न्यूयॉर्क टाईम्स'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत जॅक मा यांनी आपली 'सेवानिवृत्ती एका युगाचा अंत नाही तर एका युगाची सुरुवात' असल्याचं म्हटलंय. यापुढे मला आवडणाऱ्या शिक्षण क्षेत्रातच मी माझा वेळ आणि पैसा गुंतवणार आहे, असंही त्यांनी म्हटलंय. जॅक मा यांनी अगोदरही शिक्षक म्हणून काम केलंय. त्यांनी 17 लोकांसोबत मिळून 1999 मध्ये चीनच्या झेजियांगच्या हांगझूमध्ये आपल्या अपार्टमेंटमध्येच 'अलिबाबा'ची स्थापना केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॅक मा निवृत्तीनंतरही अलीबाबा संचालक मंडळाचे सदस्य असतील. जॅक मा सोमवारी 54 वर्षांचे होतील. याच दिवशी चीनमध्ये राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा केला जातो. 


जॅक मा यांची चीनच्या अनेक घरांत एखाद्या देवाप्रमाणे पूजा केली जाते. अनेक घरांमध्ये तुम्हाला त्यांचे फोटो सहजच पाहायला मिळतात. अलिबाबाची वर्षभराची कमाई जवळपास 250 अरब युआन (40 अरब डॉलर) आहे. जॅक यांच्यावर एक वेळ अशीही आली होती जेव्हा केएफसी़नं त्यांना नोकरी नाकारली होती... परंतु, आता मात्र alibaba.com नावानं प्रसिद्ध असलेली त्यांची कंपनी जगातील 190 कंपन्यांशी जोडली गेलेली आहे. alibaba.com वेबसाईटशिवाय taobao.com ही त्यांची बेवसाईट चीनची सर्वात मोठी शॉपिंग आहे. याशिवाय, चीनच्या मोठ्या लोकसंख्येसाठी त्यांचीच tsmall.com ही वेबसाईट ब्रॅन्डेड वस्तू पुरविते.


अलिबाबानं आपला आयपीओ 4080 रुपयांना (68 डॉलर) अमेरिकन मार्केटमध्ये सादर केला होता. मार्केट बंद होईपर्यंत या आयपीओची किंमत 5711 रुपयांवर (93.89 डॉलर) पोहचली होती. हा अमेरिकेचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असल्याचं सांगण्यात येतं.