Amazon Layoffs : गेल्या वर्षभरात अनेक बड्या कंपन्यांनी  नोकरकपातीचा निर्णय घेत कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता. आयटी क्षेत्रात आलेलं हे नोकरकपातीचं संकट अद्यापही टळलेलं नाही. कारण, जागतिक आर्थिक मंदीची चाहूल लागताच पुन्हा एकदा कंपन्यांनी त्यांच्या आर्थिक धोरणांना प्राधान्य देत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. जागतिक बँकिंग क्षेत्रात आलेलं संकट आणि आर्थिक मंदी पाहता, ई कॉमर्स कंपनी, Amazon नोकरकपातीच्या दुसऱ्या सत्रास सुरुवात करणार आहे. कंपनीचे CEO Andy Jassy यांनीच याबाबतची माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

PTI या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत गेल्या काही महिन्यांत झालेल्या कर्मचारी कपातीमध्ये अॅमेझॉनकडून 18 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला होता. 


कर्मचारी कपातीच्या दुसऱ्या सत्रात कंपनीकडून 9 हजार कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. ज्यांना पुढील काही महिन्यांमध्ये नोकरीवरून टप्प्याटप्प्यानं कमी केलं जाऊ शकतं. या कपातीमध्ये AWS, Advertising आणि Twitch विभागातील कर्मचारी प्रभावित होतील असंही कंपनीच्या सीईओंनी स्पष्ट केलं. 


पुन्हा एकदा इतकी मोठी नोकरकपात करण्यामागचं कारण काय? 


सद्यस्थिती आणि भविष्यातील आर्थिक गणितं पाहता दिसणारी अनिश्चितता पाहता मिळकत आणि ती खर्च करण्याचं चक्र संतुलित करण्यासाठी नोकरकपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कारणं अॅमेझॉनच्या सीईओंनी पुढे केलं. नव्यानं कर्मचाऱ्यांची भरती केली असली, तरीही आर्थिक घडी विस्कटू नये यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. 


ही नोकरकपात इतक्यावरच थांबणार नसून, भविष्यातही कंपनी असे निर्णय घेऊ शकते हे संकेतही कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहेत. ज्यामुळं आर्थिक मंदी येण्यापूर्वी मोठा वर्ग नोकरीला मुकणार हेच चित्र आता दिसत आहे. 


हेसुद्धा वाचा : FB-Instagram साठीचा सब्सक्रिप्शन प्लान लाँच; किती पैसे भरावे लागणार?


 


दरम्यान फक्त अॅमेझॉनच नव्हे, तर सेल्सफोर्स इंक, अल्फाबेट, मायक्रोसॉफ्ट कॉर्प यांसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांनीही हल्लीच त्यांच्या कर्मचारी संख्येत मोठी कपात केल्याचं पाहायला मिळालं. तर, फेसबुकची पॅरेंट कंपनी असणाऱ्या मेटानंही 10000 कर्मचाऱ्यांची कपात करण्याचं जाहीर केलं होतं. इतकंच नव्हे, तर कंपनीकडून 5000 Additional Open Role सुद्धा बंद करण्याचे बेत आखले जात असल्याची माहिती मार्क झुकरबर्गनं दिली होती. थोडक्यात येत्या काळात फेसबुकमध्ये नोकरभर्तीची प्रक्रिया पार पडणार नाही.