कोरोना वॅक्सिनचे15 दशलक्ष डोस वाया, गुणवत्ता पूर्ण न केल्याचा दावा
लसीचे 15 दशलक्ष डोस वाया गेले
वॉशिंग्टन: जगातील सर्व देश कोरोना लस मिळवण्याच्या मागे आहेत. दरम्यान अमेरिकेच्या एका कारखान्यात जॉनसन आणि जॉन्सनच्या (Johnson & Johnson) लसीचे 15 दशलक्ष डोस वाया गेले आहेत. इमर्जंट बायोसोल्यूशन्सद्वारे (Emergent BioSolutions)संचालित बाल्टिमोर प्लांटमध्ये अधिकाऱ्यांना वॅक्सिनचा बॅच सापडला जो दर्जेदार निकषांची पूर्तता करीत नाही. ज्यानंतर ते नष्ट करण्यात आले. सिंगल शॉट लस तयार करणार्या फार्मास्युटिकल कंपनीने असा दावा केलाय.
या प्रश्नाचं उत्तर नाही
वॅक्सिनचा बॅच उत्पादनाच्या प्रक्रियेस अनुकूल नव्हता असा कंपनीचा दावा आहे. असे असले तरी कंपनीने असे किती डोस आहेत याची माहिती दिली नाही. तसेच कोणत्या गुणवत्तेचे निकष पूर्ण झाले नाहीत याच्या अचूक कारणांची खातरजमा केली नाही. तरीही साधारण 15 दशलक्ष डोस वाया गेले असल्याचे सांगितले जाते. आमची सहकारी वेबसाईट WION ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
यूएस एफडीएचे म्हणणे आहे की, परिस्थितीबद्दल त्यांना माहिती आहे आणि फार्मा कंपनीच्या मते ते एक आवश्यक पाऊल होते गुणवत्ता आणि सुरक्षा याला सर्वोच्च प्राधान्य आहे. दरम्यान, जॉन्सन अँड जॉनसन यांनी कोरोना लसीच्या उत्पादनाच्या प्रक्रियेवर देखरेखीसाठी आणि आवश्यक ती मदत पुरवण्यासाठी तज्ञांचे एक पथक त्या जागेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
अशा मोठ्या प्रमाणात लसी नष्ट होणे हे कंपनीच्या उत्पादन दराला धक्का पोहोचवणारे आहे. या वर्षाच्या अखेरीस टार्गेट पूर्ण होईल अशी कंपनीला आशा आहे. 2021 च्या अखेरीस आम्ही एक अब्जाहून अधिक डोस विकसित करण्याचे आपले लक्ष्य पूर्ण करू असा विश्वास जॉन्सन अँड जॉनसन यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.