कबुतरं उडवून खात्मा करण्याचा प्लॅन? रशियाविरोधात अमेरिकेचा `प्रोजेक्ट पीजन`?
रशियात रोगराई पसरवण्यासाठी अमेरिकेनं कबुतरांना ट्रेनिंग दिल्याचा दावा रशियानं केला.
रशिया : रशिया-युक्रेन युद्धावरून दररोज नवनवे आरोप-प्रत्यारोप होतायेत. आता रशियानं अमेरिकेवर जैविक युद्धाचा गंभीर आरोप केलाय. जैविक युद्धासाठी अमेरिकेनं कबुतरांना ट्रेनिंग दिल्याचा दावा रशियानं केला आहे.
रशिया-युक्रेन युद्धात दोन्ही बाजूंकडून बंदुकीच्या फैरींसोबत शाब्दिक फैरीही झडत आहेत. त्यात आता अमेरिकेबाबत रशियानं एक गंभीर आरोप केला. रशियात रोगराई पसरवण्यासाठी अमेरिकेनं कबुतरांना ट्रेनिंग दिल्याचा दावा रशियानं केला. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ता इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी हे आरोप केलेत.
अमेरिकन सैन्यानं एच 5 एन 1 फ्लू स्ट्रेन पसरवण्याचं ट्रेनिंग पक्षांना दिलं आहे. त्यामुळे न्युकॅन्सल सारखा गंभीर आजार पसरतो. हा आजार माणसाच्या श्वसनावर परिणाम करतो. शिवाय पाचनसंस्थाही बिघडते. या रोगात मृत्यूदराचं प्रमाण 50 टक्के असतं, असा दावा कोनाशेन्कोव्ह यांनी केला.
पुराव्यादाखल रशियानं काही नकाशे, दस्तावेज आणि पक्ष्यांचे फोटो जाहीर केलेत. अमेरिकेनं प्रशिक्षण दिलेल्या पक्षांना युक्रेनच्या खेरासानमधून पकडण्यात आल्याचा दावाही रशियानं केला.
दुस-या महायुद्धाच्या काळातही अमेरिकेनं काही कबुतरांना प्रशिक्षित केल्याचं स्मिथ्सोनियन नॅशन म्युजिअममधील ऐतिहासिक दस्तावेजात नमूद केलंय. तेव्हा 'प्रोजेक्ट पीजन' या नावानं हे ऑपरेशन राबवण्यात आलं.
मात्र प्रत्यक्ष युद्धात कबुतरांचा वापर झाला नाही. त्यानंतर 1953 मध्ये हे प्रोजेक्ट गुंडाळण्यात आलं. आता रशियाच्या आरोपांनी अमेरिकेचं प्रोजेक्ट पीजन पुन्हा चर्चेत आलं. कोरोनामधून अद्याप पुरत्या न सावरलेलं जग पुन्हा जैविक युद्धाच्या दिशेनं ढकललं जातंय का, अशी शंका येते.