इस्त्रायल आणि हमासमधील संघर्षादरम्यान इस्त्रायलच्या एका महिलेने आपल्याला हमासच्या दहशतवाद्याने लग्नासाठी प्रपोज केल्याची माहिती दिली आहे. टाइम्स ऑफ इस्त्रायलने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. 18 वर्षीय नोगा वीस (Noga Weiss) गतवर्षी गाझामध्ये 50 दिवस हमासच्या कैदेत होते. यानंतर दोन्ही देशात झालेल्या कराराअंतर्गंत सुटका झालेल्यांमध्ये तिचाही समावेश होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोगा वीसने दावा केला आहे की, कैदेत ठेवणाऱ्या दहशतवाद्यांपैकी एकाने तिला अंगठी देत प्रपोज केला होता. तू कायमची गाझामध्ये राहशील का? माझी मुलं जन्माला घालशील का? अशी विचारणा या दहशतवाद्याने केली होती. नोगाने सांगितलं की, लग्नाची विचारणा करण्यासाठी त्याने तिला तिच्या आईचीही भेट घेतली होती. 


नोगाच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इस्त्रायलने वृत्त दिलं आहे की, नोगाने एका मुलाखतीत या घटनेचा उल्लेख केला. तिने सांगितलं की, "मला कैदेत 14 दिवस झाले होते. यावेळी त्याने मला अंगठी दिली आणि सांगितलं की, सर्वांची सुटका केली जाईल पण तू येथे माझ्यासोबत राहशी आणि माझ्या मुलांना जन्माला घालशील".


नोगाने तू त्या प्रपोजलवर काय उत्तर दिलंस अशी विचारणा करण्यात आली असता तिने सांगितलं की, मी हसण्याचं नाटक केलं जेणेकरुन तो माझ्या डोक्यात गोळी घालणार नाही. नोगाने शांतपणे त्याचा प्रस्ताव नाकारण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा यश मिळालं नाही तेव्हा ती त्याच्यावर ओरडली. 


हमासने इस्त्रायलवर हल्ला केल्यानंतर नोगाचे 56 वर्षीय वडील इलान आणीबाणी पथकात सहभागी होण्यासाठी गेले होते. पण त्यानंतर ते परतलेच नाहीत. हल्ल्यात ते मारले गेले आणि त्यांचा मृतदेह गाझाला नेण्यात आला. दहशतवाद्यांनी घरावर हल्ला केल्यानंतर नोगाच्या आईने तिला बेडखाली लपण्यास सांगितलं होतं. यानंतर दहशतवादी घरात आले आणि तिच्या आईला घेऊन गेले. 


नोगाने सांगितलं की, "जेव्हा ते आईला घेऊन बाहेर गेले तेव्हा मी गोळ्यांचा आवाज ऐकला. मला वाटलं की तिची हत्या झाली आहे. पण ती जिवंत होती. दहशतवादी घरांना आग लावत असल्याने मला बाहेर पडावं लागलं. मी लपण्याचा प्रयत्न करत असतानाही अखेर दहशतवाद्यांच्या हाती लागली. मी त्यावेळी अनेक मृतदेह पाहिले. कैद केल्यानंतर मला वेगवेगळ्या घरांमध्ये ठेवण्यात आलं. मला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेलं जात असे. मला हिजाब घालायला सांगितलं जात असे. लोकांना विवाहित जोडपं वाटावं यासाठी हात पकडायला सांगायचे".