भारतामध्ये पुन्हा हल्ला झाला तर परिस्थिती खूपच अवघड होईल; अमेरिकेचा पाकला इशारा
सीमारेषेवर दोन्ही देशांच्या सैन्याची अजूनही जमवाजमव सुरु आहे.
वॉशिंग्टन: भारतामध्ये आता पुन्हा दहशतवादी हल्ला झाला तर खूपच अवघड परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा अमेरिकेने पाकला दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात शाश्वत आणि ठोस कारवाई करावी, असेही अमेरिकेने सांगितले आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांविरोधात ठोस पावले उचलेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. विशेषत: जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा या संघटना पुन्हा काही तणाव निर्माण करणार नाहीत, याची काळजी घ्यावी. यानंतरही भारतामध्ये कोणताही दहशतवादी हल्ला झाला तर पाकिस्तानसाठी खूपच अवघड परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे दोन्ही देशातील तणाव वाढेल आणि त्याचे परिणाम भयावह असतील, असे व्हाईट हाऊसमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
विमानांसाठी लवकरात लवकर दारुगोळा खरेदी करा; वायूदलाची मोदी सरकारकडे मागणी
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायूदलाने पाकिस्तानमधील बालाकोट परिसरात एअर स्ट्राईक केला होता. यानंतर पाकिस्तानी विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय वायूदलाने चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानी विमानांना पिटाळून लावले होते. मात्र, या सगळ्यात भारतीय वायूदलाचा वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात सापडला. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता. पाकिस्तानने भारतीय वैमानिकाला सोडून दिल्यामुळे हा तणाव निवळला. मात्र, सीमारेषेवर दोन्ही देशांच्या सैन्याची अजूनही जमवाजमव सुरु आहे. पाकिस्तानकडून काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानच्या सीमेवरून भारतीय सीमेवर सैन्य हलवण्यात आले होते. याशिवाय, पाकिस्तानकडून सीमारेषेलगत एफ-१६ विमाने तैनात करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराच्या हालचालींनाही वेग आला आहे.