नवी दिल्ली : भारतीय वायुदलाकडून करण्यात आलेल्या एअर स्ट्राईक हल्ल्यानंतर हादरलेल्या पाकिस्तानमध्ये बऱ्याच राजकीयघडामोडींना वेग आला. सैन्यदलव प्रमुख आणि पाकिस्तानच्या मंत्रीमंडळाने तातडीने बैठक बोलवली. भारताने केलेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर कसं द्यावं यासाठी, ही आपातकालीन बैठक बोलवण्यात आली होती. ज्यामध्ये अखेर भारताकडून करण्यात आलेल्या हल्ल्याचं उत्तर देणार असल्याचा निर्धार पाकिस्तानने व्यक्त केला. भारतीय हल्ल्याचं उत्तर देत 'सरप्राईज' देणार असल्याचं पाकिस्तानच्या सैन्यदलाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आता सरप्राईजसाठी तयार राहा, या हल्ल्याचं उत्तर मिळणार हे नक्की. कारण, आता सरप्राईज मिळण्याची तुमची वेळ आहे', असं पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सांगितलं. भारताकडून झालेल्या हल्ल्याचं उत्तर हे शक्य त्या सर्व मार्गांनी देण्यात येणार असल्याचं पाकिस्तानकडून  सांगण्यात आलं आहे. पाकिस्तानकडून आता नेमकं कोणतं सरप्राईज येणार याविषयीच सगळीकडे सतर्कता पाहायला मिळत आहे. बालाकोट येथे हल्ला केल्यानंतर भारतातील सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांनाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. 


वाचा : India Strikes Back : वायुदलाने अशी आखली 'एअर स्ट्राईक'ची योजना


सैन्यदल अधिकाऱ्यांसोबत झालेल्या या आपातकाली बैठकीनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही देशातील जनतेला आणि सैन्याला पुढे येऊ घातलेल्या कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचा इशारा दिल आहे. तर, या हल्ल्याचं योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी उत्तर देणार असल्याचंही शेजारी राष्ट्राकडून सांगण्यात येत आहे. पाकिस्तानकडून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला असून, मंगळवारपासूनच सीमेनजीकच्या परिसरात त्यांच्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं असून मोठ्या प्रमाणावर गोळीबारही सुरू करण्यात आला आहे. ही एकंदर परिस्थिती पाहता भारत- पाकिस्तान सीमेनजीकच्या गावांमधील शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्याक आली असून, शोपियाँ, राजौरी, बारामुल्ला या आणि अशा इतर गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं आहे.