नवी दिल्ली : १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्याचं उत्तर देत पाकव्याप्त काश्मीरमध्ये जात भारतीय वायुदलाने एक मोठी कारवाई केली. मंगळवारी भारतीय वायुदलाकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये असणाऱ्या बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी तळावर हल्ला करत दोनशेहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. वायुदलाकडून करण्यात आलेल्या या एअर स्ट्राईकचा बेत फार आधीच आखण्यात आला होता. पुलवामा हल्ल्याच्या १२ दिवसांनंतर करण्यात आलेल्या या हल्ल्यासाठी वायुदलाच्या मिराज २००० या विमानांची निवड करण्यात आली होती. त्याशिवाय वायुदलाच्या विमानांच्या ताफ्यात जॅग्वॉर या लढाऊ विमानाचाही समावेश असल्याचं कळत आहे.
२६ फेब्रुवारीला सकाळी या हल्ल्याची माहिती समोर आली असली तरीही २५ फेब्रुवारीच्या रात्रीपासूनच काही घडामोडींना वेग येण्यास सुरुवात झाली होती. बालाकोट दहशतवादी तळावर हल्ला करण्यासाठीच्या मिराज विमानांचं ग्वाल्हेरमधून उड्डाण झालं होतं. तर, अर्ली वॉर्निंग जेट्सचं भटिंडा येथून उड्डाण झालं होतं. या विमानांच्या इंधनासाठी हवेतल्या हवेतच इंधन भरणाऱ्या विमानांनी आग्रा येथून उड्डाण भरलं होतं.
हाती आलेल्या माहितीनुसार या हल्ल्याचा आराखडा शिताफीने आखण्यात आला होता. वायुदलाच्या विविध तळांवरुन लढाऊ विमानांचं उड्डाण करण्यात आलं. पुढे मुजफ्फराबाद येथे या विमानांचा ताफा दाखल झाल्यानंतर कमी उंचीवरुन हा ताफा पुढे गेला. इतकच नव्हे तर भारतीय वायुदलाकडून परिसराच्या पाहणीसाठी आणि हल्ल्याच्या चित्रीकरणासाठी काही ड्रोनही सोडण्यात आले होते. हे ड्रोनही शत्रूला कल्पनाही नसेल अशा मार्गाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेले होते.
India Strikes Back : भारताच्या कारवाईवनंतर 'जैश...'ला असा बसला फटका
वायुदलाच्या १२ विमानांच्या या ताफ्याने जवळपास २१ मिनिटांमध्ये ही कारवाई केली. गेल्या १२ दिवसांपासून हल्ल्याचा बेत आखच वायुदलाच्या अधिकाऱ्यांनी हल्ल्यांचं प्रेझेंटेश तयार करत संबंधित अधिकाऱ्यांना याविषयीची माहिचती देण्य़ात आली. कोणत्या हवाई तळावरुन किती लढाऊ विमानांचं उड्डाण करण्यात येणार हे निश्चित करण्यात आलं. ठरलेल्या योजनेनुसार भारतीय वायुदलाने कारवाई केल्यानंतर लढाऊ विमानं मागे फिरल्यानंतर हवेतल्या हवेतच त्यांच्यात पुन्हा इंधन भरण्यात आलं ज्यानंतर मिराज २०००च्या साथीने हा ताफा भारतीय सीमेत दाखल झाला आणि साऱ्या जगाला वायुदलाच्या या सर्जिकल स्ट्राईकची माहिती मिळाली.