इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमधील हमास या दहशतवादी संघटनेत सध्या युद्ध सुरु आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा पट्टीवरुन रॉकेट डागल्यानंतर इस्त्रायलकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. यादरम्यान एमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गाझामधील लोकांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे. इस्त्रायल आणि हमासच्या युद्धामुळे गाझामधील हजारो नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. त्यांना मदत केली जावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"माझा पॅलेस्टाइनला पाठिंबा असून, यापुढे तो कायम राहणार आहे. आजही लढा देणाऱ्या गाझामधील शूरांना माझा सलाम आहे. नेत्यानाहू शैतान, जुलमी आणि युद्ध गुन्हेगार आहे. आपल्या देशातील बाबा मुख्यमंत्र्यांनी जे पॅलेस्टाइनचं नाव घेतील त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा दिला आहे. ऐका मुख्यमंत्री, मी सन्मानाने पॅलेस्टाइनचा झेंडा आणि तिरंगा लावला आहे. मी पॅलेस्टाइनच्या बाजूने आहे," असं असदुद्दीन ओवेसी हैदराबादमधील सभेत बोलले आहेत. 


पुढे त्यांनी म्हटलं आहे की, "मला पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन करायचं आहे की, पॅलेस्टिनी नागरिकांविरोधात सुरु असलेले अत्याचार थांबवा. पॅलेस्टाइन हा फक्त मुस्लिमांचा नाही, तर माणुसकीचा मुद्दा आहे". याआधी काँग्रेसने इस्त्रालयकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांचा विरोध करत पॅलेस्टाइनच्या हक्कांचं समर्थन केलं होतं. 


काँग्रेस कार्यकारिणीने सोमवारी इस्रायल सैन्याने आणि हमास या अतिरेकी गटाने 'तात्काळ युद्धविराम' देण्याचं आवाहन केलं आहे. तसंच पॅलेस्टिनी लोकांच्या हक्कांसाठी त्यांना पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. त्यांचा त्यांच्या जमिनीवर हक्क असून, सन्मानाने जगण्याचा अधिकार असल्याचं काँग्रेसने यावेळी सांगितलं. 


इस्त्रायल आणि हमासमधील युद्धाचा शनिवारी आठवा दिवस होता. 7 ऑक्टोबरला पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना हमासने गाझा पट्टीवरुन इस्त्रायलवर तब्बल 5 हजार रॉकेट्स डागले होते. हमासने या हल्ल्याची जबाबदारी घेताना ही इस्त्रायलविरोधातील लष्कर कारवाई असल्याचं सांगितलं होतं. हमासने फक्त 25 मिनिटांमध्ये 5000 रॉकेट्स डागले होते. यानंतर हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलमध्ये घुसखोरी करत लष्कराच्या वाहनांचा ताबा घेतला  होता. अनेक लोकांनाही त्यांनी ठार केल. या युद्धात आतापर्यंत शेकडो लोकांनी प्राण गमावले आहेत.