व्हॅक्सिन घेतल्यानंतर चौघांचा मृत्यू, `या` 11 देशांनी `कोरोना लस`चा वापर थांबवला
जगात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी संशोधन करण्यात आले.पण...
लंडन : जगात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी संशोधन करण्यात आले. त्यानंतर बाजारात कोरोना लस (Vaccination) आली. मात्र, काही ठिकाणी कोरोना लस प्रभावी ठरत असताना काही ठिकाणी लस निष्क्रीय ठरत आहे. कोरोना लसीकरणानंतर दुष्परिणाम दिसून आले आहे. त्यामुळे काही देशांनी 'कोरोना लस'चा वापर थांबविला आहे. जगातील 11देशांनी अॅस्ट्राझेनेकाच्या (AstraZeneca) कोरोना लसीचा (Corona Vaccination) वापर स्थगित केला आहे.
लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या झाल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेकडून ( डब्ल्यूएचओ) तपास सुरू आहे. लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा अॅस्ट्राझेनेका’ने केला असून, मानवी चाचण्यांदरम्यान सखोल अभ्यास केल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनी ऑस्ट्रियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून तपासासाठी पूर्ण सहकार्य करेल, असे कंपनीने म्हटले आहे.
लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी निर्माण झाल्यानंतर युराेपमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर युरोपमधील 11 देशांनी ब्रिटनमधील अॅस्ट्राझेनेका’ कंपनीच्या लसीचा वापर तात्पुरता थांबवला आहे. डेन्मार्कपाठोपाठ रोमानिया, नॉर्वे आणि आईसलँड या देशांनी लसीचा वापर थांबवला आहे, तर इटलीने लसीच्या एका बॅचचा वापर स्थगित केला आहे.