अचानक गुलाबी दिसू लागले आकाश, लोकांमध्ये खळबळ उडाल्यानंतर समोर आलं खरे कारण
अचानक आकाशाचा रंग गुलाबी झाला. हे पाहून लोकांना आश्चर्य वाटले. काही तासांतच त्यासंबंधीचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले.
मुंबई : अलीकडेच अमेरिकेत आकाश हिरवे झाल्याची बातमी आली होती. जी खूप चर्चेचा विषय बनली होती. दरम्यान मंगळवारी ऑस्ट्रेलियात, उत्तरेकडील व्हिक्टोरियन शहरातील मिल्डुरामध्ये आकाश गुलाबी झाल्याचे पाहून लोक थक्क झाले. आकाशाचा हा रंग पाहून लोकांना आश्चर्य वाटले. हा एलियनचा हल्ला तर नाही ना अशा चर्चा लोकांमध्ये सुरु झाल्या. काहींनी सायन्स फिक्शन फिल्मचा फील दिला. गुलाबी आकाशाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र, नंतर प्रकरण वेगळेच निघाले.
आकाश गुलाबी झाल्याची घटना सर्वांसाठी गूढ होती. प्रत्येकाला ते काय आहे हे जाणून घ्यायचे होते. काही वेळातच त्याचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर येऊ लागले. लोक वेगवेगळ्या प्रकारे याबद्दल बोलू लागले. काही युजर्सने तर फेसबुकवर फोटो शेअर करत एलियन्सच्या हल्ल्याशी त्याची तुलना केली. प्रकरण वाढत असल्याचे पाहून कॅन ग्रुपची औषधी कंपनी पुढे आली आणि मिल्डुरा-स्वान हिलमधील गुलाबी आकाशाचे वास्तव सांगितले.
कंपनीचे सीईओ पीटर क्रोक यांनी बुधवारी सांगितले की काल रात्री गुलाबी होण्याच्या घटनेमागे एलियन किंवा इतर शक्ती नाही. आकाश गुलाबी होण्याचे कारण म्हणजे कॅन ग्रुपने गांजाच्या रोपावर केलेला प्रयोग होता. ते म्हणाले की, तुम्हाला माहिती आहे की, गांजाच्या रोपांच्या वाढीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकाशाची गरज असते. उदाहरणार्थ, नवीन झाडे वाढवण्यासाठी लाल दिवा वापरला जातो.
आम्ही गुलाबी प्रकाश वापरत होतो. गुलाबी प्रकाश संध्याकाळनंतरच तिच्यासाठी काम करतो, म्हणून अंधार झाल्यावर तो चालू केला जातो. अचानक लोकांची नजर त्यावर पडली आणि त्यांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला. ते म्हणाले की, साधारणपणे ठरलेल्या वेळेत दिवे बंद केले जातात, पण काल तसे होऊ शकले नाही.