`चिंता करु नका, मी कोहिनूर हिरा घेऊनच लंडनवरुन परत येईन`
Britain Kohinoor Diamond: सध्या बागेश्वर बाबा इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडनमध्ये आहेत. मागील काही दिवसांपासून येथे बागेश्वर यांच्या प्रवचनांचं आयोजन करण्यात आलं आहे. अशाच एका प्रवचनामध्ये त्यांनी कोहिनूरचा उल्लेख केला आहे.
Bageshwar Dham Sarkar On Kohinoor: बागेश्वर धामचे बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडनमध्ये आहेत. सध्या ते येथील भारतीयांसाठी रामकथेची प्रवचनं करत आहेत. अशाच एका प्रवचनाच्या कार्यक्रमामध्ये बागेश्वर बाबांनी आपल्याला भारतामधून अनेक भक्तांचे फोन येत असल्याचं सांगितलं. तुम्ही परत भारतात कधी येणार अशी विचारपूस भारतीय भक्तांकडून फोनवरुन केली जात असल्याचं बागेश्वर बाबा म्हणाले.
कोहिनूर घेऊनच येणार
माझं मन आता इंग्लंडमध्येच रमलं आहे, असं मी त्यांना सांगितल्याचं बागेश्वर म्हणाले. तसेच त्यांनी, "चिंता करु नका कोहिनूर हिरा घेऊनच मी परत येईन," असंही भक्तांना सांगितल्याची माहिती दिली. पुढे बोलताना, "पूर्वी इंग्रज आपल्या देशात यायचे आणि बोलायचे. तेव्हा आपले आजोबा त्यांचं ऐकायचे. आज आम्ही इंग्लंडमध्ये येऊन बोलतोय आणि ते आपलं ऐकत आहेत," असंही म्हटलं. "येथील लोक फार छान आहेत. इंग्लंडचं भलं होवो," असं म्हणत बागेश्वर यांनी पाहुणचार करणाऱ्या ब्रिटीशांचं कौतुक केलं आहे.
कोहिनूरचा मालकी हक्क कोणाकडे?
कोहिनूर हा जगातील सर्वात सुंदर हिरा आहेत. केवळ सौंदर्यच नाही तर किंमतीच्याबाबतीत ही हा हिरा जगातील इतर कोणत्याही हिऱ्यापेक्षा सरस आहे. कोहिनूर हिरा 105.6 कॅरेटचा आहे. कोहिनूर हिरा हा कोणीही विकला नाही किंवा खरेदी केला नाही असं सांगितलं जातं. हा हिरा युद्धामध्ये जिंकला गेला किंवा एका राजाने दुसऱ्याला भेट म्हणून दिला. हाच कोहिनूर हिरा आज ब्रिटीश राजवटीमधील सर्वात मानाच्या मुकुटामध्ये केंद्रस्थानी आहे. हा मुकूट लंडनमध्ये आहे. या हिऱ्याचा मालकी हक्क सध्या ब्रिटनच्या शाही राजघराण्याकडे आहे.
लवकरच भारतात प्रवचन
समोर आलेल्या माहितीनुसार बागेश्वर बाबांचा पुढील कार्यक्रम हा काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या मतदारसंघात म्हणजेच छिंदवाडामध्ये 5 ते 7 ऑगस्टदरम्यान होणार आहे. येथील सिमरियामधील 25 एकर जमीन या कार्यक्रमासाठी भाडेतत्वावर घेण्यात आली आहे. कमलनाथ यांनी याच ठिकाणी 108 फूट उंच हनुमानाची मूर्ती आणि मंदिराची स्थापना केली आहे. याच मंदिराजवळ बागेश्वर यांचा कार्यक्रम होणार आहे.
रिल्सवरुन दिलेला इशारा
बागेश्वर यांनी लंडनला जाण्याआधी ग्रेटर नोएडामध्ये 10 ते 16 जुलै रोजी कार्यक्रमामध्ये प्रवचन केलं होतं. यावेळेस त्यांनी केदारनाथ मंदिरामध्ये रिल्स बनवणाऱ्यांना टोला लगावला होता. मंदिर, देवायले, गुरुंची आश्रमे आणि तीर्थस्थळे ही काही प्रदर्शनाची स्थळं नाहीत तर दर्शनाची आहेत. अशा ठिकाणी फोटो काढू नका. देवाचं चरित्र समजून घ्या. फोटोंसाठी नाही तर देवाचं चरित्र जाणून घेण्यासाठी येथे गेलं पाहिजे. भक्तांनी मंदिरात नक्कीच गेलं पाहिजे. मात्र श्रद्धा दाखवण्यासाठी रील्स बनवण्याची गरज नाही, असं बागेश्वर म्हणाले होते.