बँक गैरव्यवहार : नीरव मोदी याच्या कोठडीत सहा ऑगस्टपर्यंत वाढ
नीरव मोदी याच्या कोठडीत सहा ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
लंडन : भारतात बँकांची फसवणूक करणारा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात लंडनमध्ये अटकेत असलेल्या हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या कोठडीत सहा ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. नीरव मोदी यांची काल कोठडी संपल्यानंतर ब्रिटनच्या न्यायालयाने यासंदर्भात आदेश दिला. दरम्यान, ईडीने त्याची कोट्यवधींची संपत्ती जप्त करुन आधीच दणका दिला आहे.
ईडीने नीरव मोदीची ३२९.६६ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये मुंबईतल्या वरळीतील समुद्र महल या आलिशान बिल्डिंगमधील चार फ्लॅट, एक सी-साईड फार्म हाऊस, अलिबागमधली जमीन, जैसलमेरमधी पवन चक्की, लंडनमधील फ्लॅट, युएईमधला रेसिडेन्शियल फ्लॅट, शेयर आणि बँकमध्ये जमा असलेल्या रकमेचा समावेश आहे. जूनमध्ये मुंबईतल्या कोर्टाने नीरव मोदीची १,३९६ कोटीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले होते.
नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेचे १४ हजार कोटींचे कर्ज बुडवून परदेशात फरार झाला होता. गेल्या वर्षी मार्चमध्ये त्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली. तो सध्या लंडनमधील वन्डस्वर्थ कारागृहात बंद आहे. मागील महिन्यात लंडनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टाने नीरव मोदीला ९ जुलैपर्यंत कोठडी देण्याचा आदेश दिला होता.
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी सध्या लंडनमधल्या जेलमध्ये आहे. भारताच्या अपीलनंतर लंडन पोलिसांनी प्रत्यार्पण वॉरंट जारी झाल्यानंतर १९ मार्चला नीरव मोदीला अटक केली होती. नीरव मोदीविरुद्ध ब्रिटनमध्ये प्रत्यार्पणाचा खटला सुरू आहे. याप्रकरणी ७ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.
दरम्यान, नीरव मोदीच्या विरोधात भारतात प्रत्यार्पण करण्याचा खटलाही सुरु आहे. लंडनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयासमोर त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हजर करण्यात आले होते.