राष्ट्राध्यक्ष निवडणूक: ट्रम्प नको, यांना मतदान करा- ओबामांचं जनतेला आवाहन
अमेरिकेत याच वर्षी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेत सध्या कोरोना विषाणूचा कहर सुरू आहे. सुमारे 25 हजाराहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. पण यावर्षी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांची निवडणूक होणार आहेत, अशा परिस्थितीत राजकारणही सतत सुरू आहे. डेमोक्रॅट्समधून अध्यक्षपदाचे उमेदवार बनण्याच्या शर्यतीत जो बिडेन यांना आतापर्यंत मोठा पाठिंबा मिळाला आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी जो बिडेन यांच्या समर्थनाची घोषणा केली आहे आणि लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
अमेरिकेत 3 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यापूर्वी मंगळवारी बराक ओबामा यांनी जो बिडेन यांच्या समर्थनाविषयी बोलताना एक व्हिडिओ संदेश जारी केला होता.
बराक ओबामा म्हणाले की, जेव्हा मी राष्ट्रपती होतो तेव्हा जो बिडेन यांना माझे उपराष्ट्रपती म्हणून निवडण्याचा माझा सर्वात चांगला निर्णय होता, म्हणून आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी जो बिडेन हे सर्वात चांगला पर्याय आहे.
महत्त्वाचे म्हणजे, यावेळी अमेरिकन जनता कोरोना विषाणूच्या संकटावर सरकार कसं काम करत आहे हे पाहत आहे. दरम्यान रोज मृतांच्या संख्येत होणारी वाढ ही डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढवत आहे. अशा परिस्थितीत डेमोक्रॅट्सद्वारे एकता दर्शविली जात आहे आणि जो बिडेन यांचे समर्थन केले जात आहे, बर्नी सँडर्स यांनी देखील आपली उमेदवारी मागे घेतली आणि जो बिडेन यांना पाठिंबा दर्शवला आहे.
बराक ओबामा यांना राष्ट्राध्यक्षपद सोडून बराच वेळ झाला पण ते आजही लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. यामुळेच बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांनी आता जो बिडेन यांना समर्थन जाहीर केले. अलीकडेच एका महिलेने जो बिडेनवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला, त्यानंतर अमेरिकेत राजकीय भूकंप झाला.