Video: किचनमध्ये शॉवर, हॉलमध्येच वॉशिंग मशीन, फ्रीज... या फ्लॅटचं भाडं पाहून व्हाल थक्क
1 Room Odd Home Viral Video: आपल्यापैकी अनेकांनी वेगवेगळी रचना असलेली घरं पाहिली असतील. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसल्याचं व्हिडीओ पाहणाऱ्यांचं म्हणणं आहे.
1 Room Odd Home Viral Video: जगात अशी अनेक शहरं आहेत जिथलं लाइफस्टाइल आणि वास्तव्यासाठी फार पैसा मोजावा लागतो. अशी अनेक शहरं आहेत जिथे तुम्हाला राहायचं असेल तर फार जास्त पगाराची नोकरीच करावी लागेल. अन्यथा तुम्हाला हालाखीमध्ये दिवस काढावे लागतील. भारतामधील मुंबई, दिल्ली आणि बंगळुरुसारख्या शहरांबरोबरच अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचाही या महागड्या शहरांच्या यादीत समावेश होतो. न्यूयॉर्कमध्ये स्वत:चं घर घेणं हे दिवा स्वप्न आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. न्यूयॉर्क एवढं महागडं शहर आहे की इथं भाडेतत्वावर रहाणंही सर्वसामान्यांना परवडत नाही. येथील घराची भाडीही धडकी भरवतील अशी आहेत. याच न्यूयॉर्क शहरातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
घराचा आकार पाहून धक्का बसेल
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमधील घर आकाराने फारच छोटं आहे. आपल्याकडील वन रुम किचन परवडला इतकं विचित्र डिझाइन या रुमचं आहे. मात्र घर आकाराने छोटं असलं तरी त्याचं भाडं ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल यात शंका नाही.
प्रॉपर्टी एजंटनेच पोस्ट केला व्हिडीओ
व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेलं घर हे न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटनमधील नोटिला भागातील आहे. डेव्हीड ओकोचा नावाच्या एका रिअल इस्टेट डिलरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या घरासंदर्भातील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. मात्र या घराच्या इंटीरिअरपेक्षा त्याचं भाडं पाहून लोकांना अधिक मोठा धक्का बसला आहे. या घराची रचना फारच विचित्र असल्याचं स्वत: प्रॉपर्टी एजंट सांगताना व्हिडीओत दिसत आहे.
व्हिडीओमध्ये का?
हा प्रॉपर्टी एजंट चिंचोळ्या कॉमन पॅसेजमधून या घरामध्ये शिरतो. 1 ई क्रमांकाचा रुमचा दरवाजा उघडून तो आता शिरतो तेव्हा एक छोटीशी रुम दिसून येते. या रुममधील हॉल एखाद्या लॉबीसारखा दिसतोय. आयताकृती हॉल असलेल्या या घरात शिरल्या शिरल्या समोर फ्रिज आणि वॉशिंग मशीन दिसते. बाजूलाच छोटं किचन तयार करण्यात आलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे किचनच्या अगदी बाजूलाच शॉवर एरिया म्हणजेच अंघोळीची जागा आहे. ओबडधोबड आकाराच्या प्लास्टिकच्या पार्टीशनने हा शॉवर एरिया हॉलपासून वेगळा करण्यात आला आहे. इथं जेमतेम उभं राहण्याइतकी जागा आहे. टॉयलेटमध्येही केवळ कमोड असून ना हात धुण्यासाठी बेसीन आहे ना इतर कोणत्याही गोष्टींसाठी जागा. हे घरं पाहून खरोखरच तुम्हाला याची रचना अशी का आहे असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...
घराचं भाडं किती?
बरं आता हा व्हिडीओ पाहून झाल्यानंतर तुम्ही स्वत: भाडेकरु म्हणून या घरासाठी किती भाडं देण्यास तयार व्हाल? या प्रश्नावर तुम्ही आधी ही रचना पाहून इथं राहायचं की नाही असा विचार कराल, बरोबर ना? पण या घरासाठी आकारल्या जाणाऱ्या भाड्याची रक्कम ऐकून तुम्हाला धक्का बसेल. वाटेल तशी रचना असलेल्या या घराचं एका महिन्याचं भाडं भारतीय चलनानुसार तब्बल 2.9 लाख रुपये इतकं आहे. एवढ्या पैशांमध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये सी फेसिंग 3-4 बीएचकेचं घर सहज भाड्याने मिळू शकेल, नाही का?