बिअर महागणार, चवही बदलणार; मद्यपींची झिंग उतरवणारी बातमी
जर तुम्ही बिअर पित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. याचं कारण एका अभ्यासानुसार बिअरचा दर्जा आणि प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. यामागे नेमकं काय कारण आहे समजून घ्या.
जर तुम्ही मद्यप्रेमी असाल आणि बिअरचं सेवन करायला आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. याचं कारण बिअर पुढील काही दिवसांमध्ये महाग होण्याची शक्यता आहे. एका अभ्यासात बिअरला अनोखी कडू चव देणाऱ्या युरोपियन हॉप्सचा दर्जा घसरत असल्याचं समोर आलं आहे. हवामानातील अचानक बदल तसंच उष्ण, लांब आणि कोरडे उन्हाळे परिस्थिती आणखी बिघडवत आहेत. या सर्वांचा परिणाम बिअरच्या किंमतीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये तुम्हाला बिअर खरेदी करताना खिसा जरा जास्त रिकामा करावा लागेल.
नेचर कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनामुळे, हवामानातील बदलामुळे बिअरची गुणवत्ता आणि चव बदलत असल्याचा असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. अभ्यासातून समोर आलं आहे की, बिअरला अनोखी चव देणाऱ्या युरोपियन हॉप्सचा दर्जा घसरत चालला आहे. त्यात हवामानातील अचानक बदल तसंच उष्ण, लांब आणि कोरडे यामुळे परिस्थिती आणखी बिघडत आहे. त्यामुळे बिअरच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.
संशोधकांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, 2050 पर्यंत युरोपीय प्रदेशांमध्ये हॉप उत्पादनात 4 ते 18 टक्के घट होण्याची शक्यता आहे. त्यांनी शेतकर्यांना त्यांच्या शेतीची पद्धत त्याप्रमाणे बदलण्याचं आवाहन केलं आहे.
बिअरची निर्मिती करताना त्यात पाणी, यीस्ट आणि माल्ट व्यतिरिक्त हॉप्सचाही वापर केला जातो. अभ्यासानुसार, काही प्रमुख हॉप उत्पादक क्षेत्रांमध्ये जवळपास 20 टक्क्यांची घसरण होती. झेक अॅकॅडमी ऑफ सायन्सेस (CAS) आणि केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी, ही घट मागील काही वर्षांमध्ये हवामान बदलांमुळे कोरड्या स्थितीत वाढ झाल्याचं म्हटलं आहे.
"परिस्थितीशी जुळवून घेण्यात अयशस्वी ठरल्यास काही भागांमध्ये हॉपच्या वाढीला धोका निर्माण होईल. याचा परिणाम कमी उत्पादन आणि बिअरच्या किंमतीत वाढ होईल," असं झेक अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे मार्टिन मोझनी यांनी सांगितलं आहे.
कोरोनानंतर बिअरच्या किमतीत 13 टक्के वाढ झाली आहे. तसंच उच्च आणि अधिक तीव्र तापमानामुळे हॉप्सच्या अल्फा बिटर ऍसिडमध्ये घट झाली असून याचा परिणाम बिअरच्या चवीवर होत असल्याचंही शास्त्रज्ञांना आढळलं आहे.