अमेरिका  : कोरोनामुळे 2021 ला होणार बीएएम म्हणजे बृहनमहाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन 2022 पर्यंत पुढं ढकलावं लागलं. मात्र आता सर्वांची प्रतिक्षा संपली आहे. बीएएम अधिवशेनाचं आयोजन हे ऑगस्ट महिन्यात करण्यात आलं आहे. न्यू जर्सी मधल्या अटलांटिक सिटीमधे 11 ते 14 ऑगस्ट दरम्यान हे अधिवशेन होणार आहे. दर 2 वर्षांनी अमेरिकेत होणाऱ्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाची वाट फक्त अमेरिकेतलीच नाही, तर जगभरातील मराठी मंडळी बघत असतात. अटलांटिक सिटी म्हणजे अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील लास व्हेगासच. (bmm 2022 brihan maharashtra convention held in august 11 to 14 august know details)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अटलांटिक समुद्राच्या काठच्यावरच्या या अटलांटिक सिटीत कशाचीही कमी नाही. सुंदर समुद्रकिनारा, मुंबईच्या चौपाटीसारखे मोठे बीच, हॉटेल्स, मोठमोठे कॅसिनोज, लहान (आणि मोठ्या) मुलांसाठी खेळ आणि मजेची रेलचेल.


त्यात या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाची (BMM) भर. 3 दिवस मराठी संगीत, गायन, वादन, नाटके, एकांकिका, माहिती सत्रे, मित्र मंडळींच्या भेटीगाठी, गप्पा गोष्टी, अस्सल मराठी फराळ आणि जेवण. महाराष्ट्रातील नामवंत कलाकार आणि गायनी हजेरी लावतीलच. त्यांना साथ असणार आहे अमेरिका आणि कॅनडात राहणाऱ्या मराठी कलाकारांची. 


अधिवेशनाच्या आदल्या दिवशी 'बिझनेस कॉनफरन्स' होणार आहे. पद्मश्री श्रीकांत दातार आणि डॉ. आनंद देशपांडे हे बिझनेस कॉनफरन्सचे प्रमुख पाहुणे असणार आहेत.


अधिवेशनाची सुरुवात 11 तारखेला संध्याकाळी स्नेह-भोजनाने होणार आहे. त्यावेळी प्रियंका बर्वे आणि अनिरुद्ध जोशी हे मराठी आणि हिन्दी गाण्यांची मैफल रंगवतील. सत्यजित प्रभू आणि त्यांच्या बॅन्डच्या साथीने. 


अधिवेशनात शंकर महादेवन यांचे आपल्या संगीत मंडळी बरोबर गायन. प्रशांत दामले आणि मंगेश कदम यांची “सारखं काहीतरी होतय” आणि “आमने सामने” ही नाटकं. मुक्ता बर्वे, सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी यांच्या मुलाखती. अधिवेशनात नेहेमीप्रमाणे माहिती सत्रे, प्रेक्षकांच्या आवडीचे छोटे-मोठे प्रोग्राम आहेतच. विज्ञान दिंडी आहे, आणि “विष्णुजीकी रसोई” फेम विष्णु मनोहर यांचे पाकशास्त्राचे धडे.


शेवटच्या दिवशी पुष्कर श्रोत्री यांनी डझनभर कलाकारांबरोबर बसवलेल्या “मराठीचा आवाज” या कार्यक्रमाने अधिवेशनाची सांगता होणार आहे.