वॉशिंग्टन: भारतीय वायूदलाने पाकिस्तानच्या बालाकोट परिसरात केलेल्या एअर स्ट्राईकनंतर तब्बल २०० मृतदेह खैबर पख्तुनवा आणि इतर आदिवासी भागांमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमधील गिलगिट प्रांताच्या स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय असणाऱ्या अमेरिकास्थित सेनजे हसन सिरींग या कार्यकर्त्यांने स्थानिक उर्दू वृत्तपत्रांच्या हवाल्याने हा दावा केला आहे. त्यांनी यांसदर्भात ट्विट करताना एक व्हीडिओही शेअर केला आहे. यामध्ये पाकिस्तानचे लष्करी अधिकारी बालाकोट एअर स्ट्राईकमध्ये २०० दहशतवादी शहीद झाल्याचा उल्लेख करताना दिसत आहेत. हे दहशतवादी पाकिस्तानी लष्कराची मदत करत होते. अल्लाची कृपा असल्यामुळेच त्यांना शहीद होण्याचे भाग्य लाभले. या सगळ्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी लष्कर ठामपणे उभे आहे, असेही पाकिस्तानी अधिकारी बोलत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिरींग यांना या व्हीडिओच्या सत्यतेविषयी साशंकता असली तरी पाकिस्तान काहीतरी महत्त्वपूर्ण माहिती दडवून ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले. बालाकोटमध्ये ज्याठिकाणी एअर स्ट्राईक झाला तिथे आंतरराष्ट्रीय किंवा स्थानिक प्रसारमाध्यमांना जाण्याची परवानगी नाही. तर दुसरीकडे पाकिस्तानकडून भारतीय विमानांनी पळून जाण्याआधी जंगलामध्ये स्फोटके फेकल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे केवळ काही झाडे आणि कुरणांचे नुकसान झाल्याचाही पाकचा दावा आहे. परंतु, पाकिस्तानने या परिसरात जाण्यावर बंदी का घातली आहे? इतका वेळ एखादा परिसर मोकळा का ठेवण्यात आला आहे?, असे सवाल सिरींग यांनी उपस्थित केले. 



स्थानिक उर्दू वृत्तपत्रांच्या माहितीनुसार, बालाकोट हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी येथून खैबर पख्तुनवा आणि इतर आदिवासी भागांमध्ये जवळपास २०० मृतदेह पाठवण्यात आले. त्यामुळे भारताने केलेला एअर स्ट्राईक यशस्वी झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. २६ फेब्रुवारीला पहाटे भारतीय वायूदलाच्या मिराज-२००० या विमानांच्या ताफ्याने बालाकोट परिसरात हवाई हल्ला केला होता. यावेळी भारतीय विमानांनी येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर तब्बल १००० किलो स्फोटकांचा मारा केला होता. त्यामुळे याठिकाणी मोठी मनुष्यहानी आणि वित्तहानी झाली होती. मात्र, पाकिस्तानकडून ही बाब सातत्याने फेटाळली जात आहे.