इस्लामाबाद : माजी पंतप्रधान नवाझ शरीफ पाकिस्तानात आपल्या मुलीसह पाऊल ठेवत असतानाच दुसरीकडे बलुचिस्तानातल्या एका निवडणूक प्रचार सभेत झालेल्या बॉम्ब हल्ल्यात ७० जण ठार झाल्याचे वृत्त आहे. बलुचिस्तान पीपल्स पार्टीचे उमेदवार सिराज रस्सानी यांचाही या स्फोटांत मृत्यू झाला. प्रचार रॅलीदरम्यान बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात २० जणांचा जागीच मृत्यू झाला असून ४० जण जखमी झालेत. पाकिस्तानात २५ जुलैला निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या प्रचार रॅलीदरम्यान हा बॉम्बस्फोट झाला. या स्फोटाची जबाबदारी तालिबानने घेतली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भ्रष्टाचार प्रकरणामध्ये दहा वर्षाची शिक्षा झालेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम यांच्या देशवापसीपूर्वी सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आलेय. परंतु कडक सुरक्षाव्यवस्था असतानाही सहा तासांच्या आत दोन स्फोटांनी पाकिस्तान हादरले. दुपारी वजीरीस्तान भागात झालेल्या एका बॉम्बस्फोटात चार लोकांचा मृत्यू झाला तर त्यानंतर काहीच वेळात बलुचिस्तानमध्ये प्रचार रॅलीत झालेल्या स्फोटात आतापर्यंत ७० लोकांचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.



या स्फोटामध्ये सिराज यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला त्यांचे बंधू आणि माजी संसद सदस्य लशाहरी रस्सानी यांनी दुजोरा दिलाय, असे वृत्त बीबीसीने दिलेय. क्वेटा शहराच्या दक्षिणेला ३५ किमी अंतरावर असणाऱ्या एका गावात राजकीय प्रचार रॅली सुरू होती. तिथे हा बॉम्बस्फोट झाल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. हा स्फोट एवढा शक्तीशाली होता की १० किलोमीटरपर्यंतचा प्रदेश हादरला.