पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये मशिदीत बॉम्बस्फोट, चार ठार १५ जखमी
उल्लेखनीय म्हणजे दोन आठवड्यांपूर्वीही बलुचिस्तानमध्ये एक बॉम्बस्फोट झाला होता
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात मोठा बॉम्बस्फोट झाल्याचं वृत्त हाती येतंय. क्वेटाजवळच्या कुचलाकच्या एका मशिदीत हा स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटामुळे मशिदीचं छत खाली कोसळलं. आत्तापर्यंत या स्फोटात चार जण ठार तर १५ जण जखमी झाल्याचं समजतंय.
अद्याप कोणत्याही संघटनेनं या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. स्फोटानंतर लगेचच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीनं जखमींना नजिकच्या रुग्णालयात हलवलं. संपूर्ण भागाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
उल्लेखनीय म्हणजे दोन आठवड्यांपूर्वीही बलुचिस्तानमध्ये एक बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात पोलिसांच्या एका वाहनाला निशाण्यावर घेण्यात आलं होतं. या स्फोटात दोन पोलिसांसह पाच जणांचा मृत्यू झाला तर ३८ जण जखमी झाले होते.