मुंबई : बऱ्याच कर्मचाऱ्यांची ही तक्रार असते ती, त्यांनी कितीही मेहनत घेतली. कितीही काम केलं तरी देखील त्यांचा बॉस कधीही समाधानी नसतो. कंपनीचा कितीही नफा झाला तरी, प्रत्येक बॉस आपल्या कर्माऱ्यांना आणखी मेहनत घ्यायला सांगतो. ज्यामध्ये बऱ्याच कर्मचाऱ्यांची तक्रार असते की, ते जितकी कंपनीसाठी मेहनत घेतायत, त्या मानाने त्यांना पैसे किंवा पगार देखील मिळत नाहीत. बॉसकडे याबाबत अनेकदा बोलून देखील त्यांचा बॉस ही गोष्ट कधीही मनावर घेत नाही. ज्यामुळे बहुतांश लोक आपल्या बॉसबद्दल वाईट बोलताना पाहायला मिळतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु एक अशी कंपनी आहे, जेथे कर्मचारी कधीही त्यांच्या बॉसची तक्रार करत नाहीत. उलट ते सर्वांना गर्वाने सांगितील की, 'बॉस असावा तर असा!'


हो तुम्ही बरोबर ऐकलंत. एक अशी कंपनी आहे. ज्यांनी त्यांच्या सर्वच कर्मचाऱ्यांना जास्त नफा मिळवल्यामुळे जास्त पैसे बोनस म्हणून देऊ केले आहे. या कंपनीच्या बॉसने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना सुमारे 62 हजार रुपये दिले आहेत. जेणेकरून त्यांना वीज बिलाच्या वाढीव दरामुळे कोणतीही अडचण येऊ नये.


जर कंपनी नफा कमवत असेल तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना त्यांचे बक्षीस मिळालेच पाहिजे, असे त्यांच्या बॉसचे मत आहे. ज्यामुळे त्याने हे पाऊल उचललं आहे.


ब्रिटनच्या एमरी टिंबर अँड बिल्डर्स मर्चंट्सचे व्यवस्थापकीय संचालक जेम्स हिपकिन्स (51) यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एक जबरदस्त भेट दिली. त्यांनी कंपनीच्या 60 सदस्यांमध्ये सुमारे 37 लाख रुपये वाटले.


जेम्स म्हणाले की, त्यांना माहित आहे की प्रत्येकजण सध्या संकटात आहे. अशा परिस्थितीत त्यांना कर्मचाऱ्यांना मदत करून कंपनीचा नफा वाटून घ्यायचा होता. वास्तविक, गेल्या आठवड्यातच ब्रिटनमध्ये वीज बिलांमध्ये मोठी वाढ झाली आहे. एका श्रेणीतील घरांसाठी कौन्सिल टॅक्स बिलातही 3.5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर पाण्याच्या बिलातही वाढ करण्यात आली आहे.


जेम्सने द सनशी संवाद साधताना सांगितले, "प्रत्येकजण सध्याच्या परिस्थितीशी झगडत आहे. अशा परिस्थितीत आम्हाला आमच्या कर्मचार्‍यांसह काही आनंद वाटायचा आहे. कर्मचारी सदस्यांना या बोनसची अपेक्षा नव्हती, ज्यामुळे त्यांना ही रक्कम मिळताच, ते खूप आनंदी झाले. या प्रतिकूल परिस्थितीत त्यांच्यासाठी ही मोठी मदत आहे."


जेम्सला आशा आहे की, हे पैसे त्यांच्या कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी मदत करेल. यूकेमध्ये मूलभूत गोष्टींच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत कंपनीच्या मालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मदत करावी, असे जेम्सला वाटते.



एमरीज टिंबर अँड बिल्डर्स मर्चंट्सच्या मालकाने सांगितले की, कंपनी नफा कमवत असेल तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बक्षीस न देणे हे चुकीचे आहे, असे त्यांचे मत आहे.


ते म्हणाले- आमच्या कंपनीच्या व्यवसायात चांगला नफा मिळत आहे आणि याचं श्रेय या कर्मचाऱ्यांना जातं. त्यामुळे त्यांना या नफ्यातील काही देण्यास काहीही हरकत नाही.


जेम्स शेवटी म्हणाले, "एक चांगला बॉस तो असतो जो चांगला नफा कमावतो. त्याचबरोबर कंपनीतील प्रत्येकाला चांगले वातावरण आणि चांगली संधी देणे ही त्याची जबाबदारी असते."