‘ब्रिक्स’ परिषदेकडे संपूर्ण जगाचं लक्ष! पण भारताचा समावेश असलेलं BRICS आहे तरी काय?
BRICS Summit 2023 What Is BRICS: `ब्रिक्स`ची 15 वी परिषद जोहान्सबर्गमध्ये 22 ते 24 ऑगस्टदरम्यान पार पडत असून अमेरिकेसहीत संपूर्ण युरोपचंही या देशांच्या बैठकीकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. पण हे `ब्रिक्स` देश नेमके आहेत तरी काय? ते का एकत्र आले जाणून घ्या...
BRICS Summit 2023 What Is BRICS: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहाटे 'ब्रिक्स' देशांच्या परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले. दक्षिण आफ्रिकेमध्ये आज म्हणजेच 22 जून 2023 पासून ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या 5 देशांच्या ‘ब्रिक्स’ राष्ट्रांच्या परिषदेला सुरुवात होत आहे. 'ब्रिक्स'ची 15 वी परिषद जोहान्सबर्गमध्ये 22 ते 24 ऑगस्टदरम्यान पार पडत असून यामध्ये अनेक धोरणात्मक निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. अगदी अमेरिकेचं लक्षही या परिषदेकडून लागलेलं आहे. मात्र ही ब्रिक्स संघटना आहे तरी काय? तिची स्थापना का करण्यात आली आहे? त्याचं उद्देश काय जाणून घेऊयात...
'ब्रिक्स'चा अर्थ काय?
'ब्रिक्स' हे नाव या संघटनेमधील सहभागी देशांच्या आद्यक्षरांवरुन तयार करण्यात आलं आहे. B म्हणजे ब्राझील, R म्हणजे रशिया, I म्हणजे इंडिया, C म्हणजे चीन, S म्हणजे साऊथ आफ्रिका. प्रत्येक देशाचं पहिलं अक्षर घेऊन BRICS हे नाव तयार करण्यात आलं आहे. भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा सहभाग असलेली ही शिखर संघटना. ही संघटना स्थापन झाली तेव्हा 4 देश या संघटनेचे सदस्य होते. त्यावेळी या संघटनेचं नाव, 'ब्रिक' असं होतं. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकाही यामध्ये सहभागी झाल्याने संघटनेच्या नावात शेवटी एस अक्षराचा समावेश करण्यात आला.
या संघटनेची उद्दीष्ट कोणती?
'ब्रिक्स' देशांच्या अर्थव्यवस्थांच्या भरभराटीसाठी एकत्रितपणे निधी उपलब्ध करणे, एकमेकांसोबतचे आर्थिक सहकार्य वाढवणे, सर्व सहभागी देशांची आर्थिक सुरक्षितता अधिक मजबूत करणे अशी या संघटनेची प्राथमिक उद्दिष्टं आहेत.
देशांमधील साम्य काय?
2001 मध्ये आर्थिक घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या 'गोल्डमन सॅक्स'मधील अर्थशास्त्रज्ञ जिम ओ'नील यांनी पहिल्यांदा "BRIC" (दक्षिण आफ्रिका वगळून पूर्वी अस्तित्वात असलेल्या संस्थेचं नाव) ही संज्ञा वापरली. 2050 पर्यंत या 4 ब्रिक देशांच्या अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेवर राज्य करतील, असा अंदाज जिम ओ'नील यांनी व्यक्त केली. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका देशही सामान कार्यक्रमाच्या आधारावर या संघटनेमध्ये सहभागी झाला.
नक्की वाचा >> अमेरिकेच्या मत्तेदारीविरोधात एकवटले 'ते' 40 देश? BRICS मुळे महासत्तेचं धाबं का दणाणलं?
पहिली परिषद कधी झाली?
'गोल्डमन सॅक्स'मधील 'ब्रिक' देशांच्या प्रमेयाची पकड घट्ट होत गेली तेव्हा 2008 मध्ये 4 राष्ट्रांचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच एकत्र आले. त्यानंतर आलेल्या जागतिक मंदीमुळे 'ब्रिक' देशांना एकमेकांच्या आधाराची अधिक गरज वाटू लागली. त्यामुळेच 16 जून 2009 रोजी ब्रिकचे 4 देश एकत्र आले आणि या 4 ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांची पहिली शिखर परिषद पार पडली. रशियामधील एडातरीनबर्ग येथे ही पहिली परिषद पार पडली. भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या 4 राष्ट्रांनी परस्परांमधील सहकार्य आणि संघटन वाढविण्यावर भर दिला होता.
आकडेवारीनुसार सर्वात शक्तीशाली संघटनेपैकी एक
एकूण, BRICS देशांमधील लोकसंख्येचा विचार केल्यास या 5 देशांमधील लोकसंख्या ही जागतिक लोकसंख्येच्या 41% इतकी आहे. जागतिक GDP च्या 24% जीडीपी या 5 देशांचा आहे. तर जागतिक व्यापारात हे 5 देश 16% वाटा उचलतात. त्यामुळेच या संघटनेला जागतिक स्तरावर फारच महत्त्व आहे.