मोठी बातमी: जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल इंग्लंडच्या पंतप्रधानांचा संसदेत पश्चाताप
थेरेसा मे यांची ही कृती ऐतिहासिक अशी मानली जात आहे.
लंडन: भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील क्रूरतेची परिसीमा गाठणाऱ्या जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल बुधवारी इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी ब्रिटीश संसदेत जाहीरपणे खेद व्यक्त केला. थेरेसा मे यांची ही कृती ऐतिहासिक अशी मानली जात आहे. थेरेसा मे यांनी म्हटले की, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या घटनेबद्दल आम्हाला पश्चाताप वाटतो.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात १३ एप्रिल १९१९ रोजी बैसाखीच्या दिवशी पंजाबमधील जालियनवाला बागेत सभेचे आयोजन करण्यात आले होते. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरोधात सभेसाठी सुमारे १५ ते २० हजार नागरिक जालियनवाला बागेत जमले होते. मात्र, यामुळे खवळलेल्या ब्रिटीश अधिकारी जनरल रेगिनाल्ड ई. एच. डायर याने बागेतून बाहेर निघण्यासाठी असणाऱ्या एकमेव रस्त्याची नाकाबंदी केली. यानंतर जनरल डायरने सैनिकांना नागरिकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले. यावेळी ५० सैनिकांनी १६५० फैरी झाडल्या. यामध्ये एक हजार भारतीय नागरिक शहीद झाले. तर ११०० जण जखमी झाले होते.
यापूर्वी २०१३ साली ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनीही भारत दौऱ्यावर असताना जालियनाला बाग हत्याकांडाबद्दल खेद व्यक्त केला होता. जालियनवाला बागेमध्ये ‘त्या’ दिवशी जे काही घडले, ती ब्रिटिशांच्या इतिहासातील अतिशय लाजीरवाणी घटना होती. विन्स्टन चर्चिल यांनी तिचे घृणास्पद म्हणून केलेले वर्णन सुयोग्य आहे. या जागेमध्ये काय घडले, हे आम्ही कधीच विसरू शकणार नाही. त्या घटनेची आठवण म्हणून ब्रिटन कायमच जगात शांततापूर्ण निदर्शनाच्या हक्काच्या बाजूने उभा राहील, असे कॅमेरून यांनी म्हटले होते.