नैरोबी : बुरुंडीचे राष्ट्राध्यक्ष पिएरे नकुरुंजिजा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं समोर आलं आहे. ते 56 वर्षांचे होते. बुरुंडी सरकारने म्हटले आहे की, पिएरे नकुरुंजिजा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. पण लोकांना अशी शंका होती की, त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी रात्री प्रकृती बिघडल्यामुळे राष्ट्राध्यक्षांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सरकारने सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यांची प्रकृती रविवारी सुधरली होती. परंतु सोमवारी सकाळी अचानक त्यांची तब्येत बिघडली. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा मृत्यू झाला.


बुरुंडीच्या सरकारने एका आठवड्यासाठी शोक जाहीर केला आहे. पिएरे नकुरुंजिजा यांचे निधन अशा वेळी झाले जेव्हा काही दिवसातच नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होणार होता. सरकारचे पुढील पाऊल काय असेल हे अद्याप समजू शकलेले नाही.


डेविड गाकुंजी यांनी माहिती दिली की, "बुरुंडीच्या संविधानानुसार जेव्हा सत्ता हस्तांतरित होण्यापूर्वी एखाद्या राष्ट्रपतीचा मृत्यू होतो, तेव्हा संसदेचे अध्यक्ष सत्ता हातात घेतात आणि पुन्हा निवडणुका होतात, पण मला वाटते की नेतृत्व याकडे दुर्लक्ष करेल आणि एवारिस्टे नदायिशिमिये  यांच्याकडे सत्ता सोपवेल.



बुजुम्बुरा येथील रहिवासी जस्टिन नवाबेंदा यांनी म्हटलं की, जेव्हा कोरोनाबाधित राष्ट्राध्यक्षांची पत्नी केनियाला गेली होती, तेव्हा बुरूंडीतील बर्‍याच लोकांना अध्यक्षही आजारी असल्याचा संशय आला होता."


केनियाच्या माध्यमांनी सांगितले की, 'कोरुना विषाणूच्या संसर्गामुळे नकुरुंजिजा यांची पत्नी डेनिस यांना मेच्या अखेरीस नैरोबीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.'


बुरुंडी सरकारने या संक्रमणाकडे दुर्लक्ष करून निवडणुका आणि मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या. जागतिक आरोग्य संघटनेने याबद्दल चिंता व्यक्त केली होती. निवडणुकीच्या काही दिवस आधी, जागतिक आरोग्य संघटनेच्या उच्च अधिकाऱ्याला देशातून काढून टाकले होते. आतापर्यंत देशात कोरोनाचे 83 रुग्ण आढळले आहेत.