Hinduja Family Accused Of Exploiting Staff : जगभरातील अनेक धनाढ्य कुटुंबांविषयी, त्यांच्या जीवनशैलीविषयी सामान्यांना कायमच कुतूहल वाटत असतं. त्यांचं राहणीमान कसं असेल, इथपासून त्यांच्या सेवेत किती मदतनीस असतील, ते कुठं राहात असतील, कसा प्रवास करत असतील अशा अनेक प्रश्नांचा या कुतूहलात समावेश असतो. अशा या धनाढ्यांच्याच यादीत येणारं एक भारतीय कुटुंब सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलं असून, त्यांच्या एका कृत्यामुळं जगभरातून सडकून टीका करण्यात येत आहे. किंबहुना अनेकांनीच त्यांच्या कृत्याला क्रूरतेचं नावही दिल्यामुळं या प्रकरणाला आता गंभीर वळण प्राप्त होताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युनायटेड किंग्डममधील सर्वाधिक श्रीमंत कुटुंबापैकी एक असणाऱ्या हिंदुजा कुटुंबानं सध्या संपूर्ण जगाचं लक्ष एका नकारात्मक कारणामुळं वेधलं आहे. मानवी तस्करी आणि स्विस व्हिलामध्ये कर्मचाऱ्यांचा छळ करण्यासोबतच त्यांच्यावर इतरही काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. जिनिव्हामध्ये हिंदुजा कुटुंबावर लावण्यात आलेल्या गंभीर आरोपांसंदर्भातील खटला सुरु असून, या कुटुंबातील चार सदस्यांवर कर्मचाऱ्यांचे पासपोर्ट जप्त करून त्यांना पगारात अवघे 600 ते 650 रुपये देण्याचा आरोप करण्यात आला आहे. 


व्हिलामध्ये काम करणारे नोकरचाकर आणि मदतनीसांना 15 ते 18 तासांच्या कामाचा मोबदला म्हणून अवघे 8 डॉलर म्हणजे साधारण 654 रुपये देण्याचा आरोप करण्यात आला. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांना भारतातच त्यांच्या कामाचा मोबदला देण्यात आला असून, त्यामुळं त्यांच्याकडे स्विस चलन आढळलं नाही. 


श्वानावर लाखोंचा खर्च


एका तक्रारदारानं हिंदुजा कुटुंबावर त्यांच्या पाळीव श्वानावर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अधिक खर्च केल्याचा आरोप केला. 'पेट्स' नावाच्या खर्च नोंदीचा उल्लेख करत हिंदुजा कुटुंबासाठी एका महिला कर्मचाऱ्याला 15 ते 18 तासांच्या कामासाठी जवळपास 7.84 डॉलर इतकाच पगार दिला जात होता. तर, दुसरीकडे श्वानावर दरवर्षी हे कुटुंब 8,584 स्विस फ्रँक म्हणजेच साधारण 8,09,384 रुपये इतका खर्च करतं, ही बाब न्यायालयापुढं मांडण्यात आली. 


न्यायालयापुढं सदर प्रकरणी वकिलांनी हिंदुजा कुटुंबातील प्रकाश हिंदुजा, त्यांच्या पत्नी कमल, मुलगा अजच आणि मुलाची पत्नी नम्रता यांना वर्षभराची शिक्षा ठोठावण्यात यावी अशी मागणी केली. सूत्रांच्या माहितीनुसार मतदनीस यवेस बर्टोसा यांनी केलेल्या मागणीनुसार या कुटुंबानं न्यायालयीन खर्चासाठी 1 मिलियन स्विस फ्रँक आणि कर्मचारी निधीसाठी 3.5 मिलियन स्विस फ्रँक इतकी रक्कम देऊ करावी. 


हेसुद्धा वाचा : 'मोदी सरकार म्हणजे पेपर लीक सरकार' UGC-NET परीक्षा रद्द होताच काँग्रेसचा घणाघात 


दरम्यान, हिंदुजा कुटुंब मदतनीस आणि नोकरचाकरांच्या पगार आणि तत्सम गोष्टींमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सहभागी नसल्याची बाब या कुटुंबाच्या वकिलांनी न्यायालयापुढं मांडली. वेतनाची मोजणी फक्त रोख स्वरुपात केली जात नसून, कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्थाही इथं केली गेल्याची बाब हिंदुजा कुटुंबाच्या वकिलानं पुढे करत 18 तास काम, ही बाब अतिशयोक्ती असल्याचं म्हटलं. 


बँकिंग, शिपिंग, माध्यमं या आणि अशा इतर अनेक क्षेत्रांमध्ये सक्रिय असणाऱ्या हिंदुजा कुटुंबाच्या एकूण संपत्तीचा आकडा 1,66,85,55,000 रुपये इतका सांगितला जातो. तेव्हा आता या धनाढ्य कुटुंबाकडून कथित स्वरुपात मदतनीसांना मिळालेली वागणूक पाहता न्यायालयाकडून कोणता निर्णय खघेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल.