... म्हणून चिनी कंपनी `TikTok`ऍप विकण्याच्या विचारात
चीनची आर्थिक घडी विस्कटली
नवी दिल्ली : चीनमध्ये उदयास आलेल्या कोरोना वादळाने संपूर्ण जगात हाहाःकार माजवला आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि चीनमधून होणाऱ्या कुरापतींमुळे अनेक चिनी कंपन्या मोठ्या संकटात अडकल्या आहेत. एकंदर या सर्व गोष्टींचा परिणाम TikTok ऍपला चांगलाच सहन करावा लागत आहे. भारत आणि चीन मधील तणाव चांगलाच वाढताना दिसत असून, हा वाढता तणाव पाहता भारतात अनेक चिनी वस्तूंवर बहिष्कार देखील टाकला आहे. केंद्र सरकारने TikTok सोबत अन्य ५९ चिनी ऍप्स भारतात बॅन केले.
भारताने चीनविरूद्ध महत्त्वाचे पाऊल उचलल्यानंतर अमेरिका देखील यामुद्द्यावर विचार करत असल्याचं समोर येत आहे. एवढचं नाही तर पाकिस्तानात देखील TikTok बॅन करण्याची मागणी होत आहे. दरम्यान जगातील वातावरण पाहता चिनी कंपनी Bytedance लवकरच TikTok ऍप विकण्याचा निर्णय घेवू शकते.
व्हाईट हाऊसने देखील यावर अंदाज वर्तवला आहे. चिनी कंपनी Bytedance स्वतःला वाचवण्याकरता वादग्रस्त TikTok ऍप विकण्याची शक्यता आहे. असं मत अमेरिकेचे आर्थिक सल्लागार लॅरी कुडलो (Larry Kudlow) यांनी वर्तवलं आहे.
'आम्ही चिनी अॅपवर बंदी घालण्याचा अंतिम निर्णय घेतलेला नाही. परंतु ज्याप्रकारे TikTokच्या विरोधात वातावरण तयार होत आहे. ते पाहता Bytedance लवकरच TikTok ऍप विकण्याचा निर्णय घेवू शकते. TikTok ऍपवर बंदी घातल्यामुळे Bytedance कंपनीसोबत चीनला देखील मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याचं लॅरी कुडलो यांनी सांगितलं.