नवी दिल्ली : इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी रविवारी चाबहार बंदराचं उद्घाटन केलं.


भारताने केली कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणुक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चाबहार बंदर हे इराणच्या दक्षिणेला ओमानच्या आखातात आहे. बंदर जरी इराणमध्ये असलं तरी त्याच्या बांधणीत भारताची भूमिका महत्वाची आहे. भारताने कोट्यवधी डॉलर्सची नुसती गुंतवणुकच केलेली नाही तर तंत्रज्ञानाच्या पातळीवरसुद्धा महत्वाची भूमिका बजावली आहे.


पाकिस्तानचं ग्वादर बंदर


चीन पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रचंड गुंतवणुक करतोय. रस्ते आणि बंदराची बांधतोय. त्याचाच भाग म्हणून बलुचिस्तानमध्ये ग्वादर बंदर बांधण्यात आलंय. व्यापारी आणि लष्करीदृष्टीकोनातून त्याचं महत्व खूप आहे. चीन स्वत:च्या व्यापाराबरोबरच त्याचा वापर, आण्विक पाणबुड्यांचा तळ म्हणूनही करतोय. त्याबरोबरच मध्य आशियातल्या देशांशी असलेल्या व्यापारातसुद्धा ग्वादर बंदराचं महत्व फार आहे. त्यामुळेच ते भारतासाठी मोठं आव्हान आणि धोका आहे.


चाबहार बंदराचा परिणाम


चाबहार हे बंदर पाकिस्तानच्या ग्वादर बंदरापासून ८५ किमी अंतरावर ओमानच्या आखातात आहे. या बंदरामुळे अफगाणिस्तानसकट सर्व मध्य आशियातल्या देशांसाठी सोयीचा आणि जवळचा मार्ग निर्माण झाला आहे. चाबहार बंदरामुळे अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील देशांना व्यापारासाठी पाकिस्तानवर अवलंबून राहावं लागणार नाही. त्यामुळे आपोआपच ग्वादर बंदर आणि पर्यायाने पाकिस्तानचंसुद्धा महत्व कमी होणार आहे.


भारताचा मास्टर स्ट्रोक


चाबहार बंदरामुळे भारत, इराण आणि अफगाणिस्तानला व्यापारात प्रचंड वाढ होणार आहे. या बंदराला इराणच्या रेल्वे आणि रस्त्यांच्या जाळ्याने अफगाणिस्तान तसच मध्य आशियातील देशांना जोडण्यात य़ेईल. नुकताच १,११,००० टनाची गव्हाची पहिली खेप यामार्गे अफगाणिस्तानला पाठवण्यात आली. त्याबरोबरच पाकिस्तान आणि चीनची लष्करी कोंडी करता येणार आहे. यामुळेच चाबहार बंदराला या भागातील गेम चेंजर म्हटल जातंय. आंतरराष्ट्रीय राजकारणात हा भारताचा दिर्घकालीन मास्टर स्ट्रोकच आहे.