China Bank Crisis : महासत्ता म्हणून मिरवणारा चीन कंगाल
महासत्ता म्हणून शेखी मिरवणाऱ्या चीनचं देखील दिवाळं निघालंय. लाखो ग्राहकांची बँक खाती गोठवण्यात आलीयत.
बिजिंग : महासत्ता म्हणून शेखी मिरवणाऱ्या चीनचं देखील दिवाळं निघालंय. लाखो ग्राहकांची बँक खाती गोठवण्यात आलीयत. ग्राहकांनी बँकांतून पैसे काढू नयेत, म्हणून चीन सरकार निर्दयपणं वागतंय. बँकांबाहेर चक्क रणगाडे उभे करण्याची वेळ आलीय.. पाहूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट. (china bank crisis raised an army of tanks to stop the entry in the banks)
हे रणगाडे पाहिलेत. एखाद्या युद्धाच्या तयारीसाठी हे रणगाडे रस्त्यावर तैनात केलेले नाहीत. तर बँकांच्या बाहेर खडा पहारा ठेवण्यासाठी हे रणगाडे उभे केलेत. ही दृश्यं आहेत स्वतःला महासत्ता समजणाऱ्या चीनमधली. चीनच्या हेनान प्रांतातली ही दृश्यं आहेत. चीनमधले नागरिक सध्या बँकांमधून पैसे काढून शकत नाहीत.
त्यामुळं भडकलेल्या लोकांनी बँकांबाहेर निदर्शनं सुरू केली. बँकांनी त्यांची खाती गोठवलीत, असा या आंदोलकांचा दावा आहे. लोकांना बँकेत जाण्यास मज्जाव करण्यात आलाय. त्यामुळं चिनी लोकांचा संतापाचा पारा आणखीच चढलाय. परिस्थिती एवढी हाताबाहेर गेलीय की, बँकांच्या सुरक्षेसाठी चक्क रणगाडे तैनात करण्यात आलेत.
चीनवर ही वेळ नेमकी का आली, हे जरा समजून घेऊया.
चिनी मीडियातल्या बातम्यांनुसार, बँकांमध्ये मोठे आर्थिक गैरव्यवहार झालेत. तब्बल 48 हजार कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे. लाखो ग्राहकांची बँक खाती गोठवण्यात आलीत. हेनान आणि अनहुई प्रांतातील लोकांना बँक खात्यांचा वापर करण्यास मनाई करण्यात आलीय.
त्यामुळं चिनी जनतेचा राग अनावर झाला नसता तरच नवल. हजारो लोक रस्त्यावर उतरले. त्यांना रोखण्यासाठी रणगाडे देखील रस्त्यावर उभे करण्यात आलेत. यामुळं १९८९ सालच्या थियानमन चौकातील रक्तरंजित आंदोलनाच्या आठवणी जाग्या झाल्यात. त्यावेळी आंदोलकांवर रणगाडे चढवण्यात आले होते. त्यात तीन हजाराहून अधिक आंदोलक ठार झाले होते. आता त्याच इतिहासाची पुनरावृत्ती चीनमध्ये होणार का, याचीच भीती व्यक्त केली जातेय.