चीन झुकला, मागे हटला : पलटवार करणाऱ्या चीनवर विश्वास ठेवायचा का?
भारतानं तैनात केलेलं सैन्य पूर्वीच्या चौक्यांवर परतलं
अमर काणे, रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : भारतापुढे गुडघे टेकत अखेर चीननं माघार घेतलीय. पँगोंग लेक जवळ आता थोडा तणाव कमी होऊन शांतता नांदेल अशी आशा आहे... पण चीन कमालीचा बेभरवशी असल्यानं गाफील राहून चालणार नाही. अखेर चीननं माघार घेतलीच 9 महिन्यांची मुस्सदेगिरी यशस्वी झाली आहे. पण खोटारड्या चीनवर विश्वास ठेवायचा का?
पूर्व लडाखच्या अतिथंड वाळवंटी प्रदेशात गेले 9 महिने भारताचे जवान तैनात होते. युद्धखोर चीनच्या कारवाया रोखण्यासाठीची ही खबरदारी होती.. आता मात्र भारतानं तैनात केलेलं सैन्य पूर्वीच्या चौक्यांवर परतू लागलं आहे.
निळ्या शार पँगोंग त्सो लेकवर गेले ९ महिने युद्धाच्या ढगांनी गर्दी केली होती. बुधवारी संध्याकाळी अचानक गर्दी कमी होण्यास सुरुवात झाली. साम्राज्यवादी चीनी लष्करानं भारताच्या निर्धारासमोर गुडघे टेकले. २४ जानेवारीला लष्कराच्या कंमाडर स्तरावरच्या नवव्या फेरीच्या चर्चेत पूर्व लडाखमधून सैन्य माघारी घेण्याचा निर्णय झाला. गुरुवारी राज्यसभेत संरक्षण मंत्र्यांनी भारताच्या गेल्या ९ महिन्यातल्या चीनशी असणाऱ्या संबंधात आलेल्या चढ-उतारांचा लेखाजोखा मांडला
गेले ९ महिने चीन आणि भारताचे सैनिक पेंगाँग लेकच्या परिसरात आमने सामने आहेत. २४ जानेवारीला झालेल्या समझौत्यानुसार पँगोंग लेकच्या अग्नेय किनाऱ्यावरुन दोन्ही देश आपले सैन्य मागे घेतील. माघारीची प्रक्रिया ४८ तासात पूर्ण होईल . तसेच भारतीय सैन्य फिंगर ३ जवळ तर चीनी सैन्य फिंगर ८ जवळ तैनात राहील. दोन्ही फिंगरमधला परिसर हा पेट्रोलिंग फ्री झोन असेल. पण ड्रँगनचा खोटारडेपणा जगजाहीर असल्यानं त्यांच्यावर विश्वास ठेवताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे
आधी अरुणाचल सीमेवरच्या डोकलाममध्ये चीननं घुसखोरीचा प्रयत्न केला. तो भारतानं हाणून पाडला. त्यानंतर गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात गलवानमधील रक्तरंजित संघर्षात आपले २० जवान शहीद झाले.पण चीनलाही त्यांच्या युद्धखोरीची किंमत भारतानं चीनला मोजायला लावली. आज पँगोंगत्सो लेक जवळूनही चीनन्यांनी माघार घेतली. पण अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे हे विसरून चालणार नाही..