नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये नक्की मृत्यू की ? २५ हजारांच्यावर मृत्यू झाल्याचा एक रिपोर्ट चिनी कंपनीच्या संकेतस्थळावर लिक झाला आहे. दरम्यान, हा लिक झालेला रिपोर्ट हटविण्यात आला असून त्याठिकाणी कमी आकडा असलेला सरकारी रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे चीनची ही बनवाबनवी कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तर कोरोनाच्या धास्तीमुळे जगातील अनेक मोठ मोठ्या कंपन्यांनी चीनमधील आपला व्यवसाय थांबवला आहे. त्यामुळे येथील मोठ्या कंपन्यांची शोरुमना टाळे लावण्यात आले आहे. त्यामुळे चीनची आर्थिक कोंडी झाली आहे. तर दुसरीकडे कोरोना व्हायरसचा धसका यामुळे चीन पुरता हैरान झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत ६३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर संपूर्ण जगभरात ३० हजार ८३४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. एकट्या चीनमध्येच कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा ३१ हजार १६१ इतका असल्याचं सरकारनं सांगितलं आहे. कोरोनाची लागण झालेले नवे ३ हजार १४३ रुग्ण आढळल्यामुळे हा आकडा ३० हजारांच्या पलिकडे गेल्याची माहिती, चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिली आहे. कोरोना व्हायरसनं जगामध्ये धास्ती आहे. चीनची तर वाट लागली आहे. हा व्हायरस अडवायचा कसा, याची चिंता असताना आता एक नवीनच चर्चा सुरू झाली आहे. कोरोनामुळे सुमारे ७०० मृत्यू झाल्याचं सांगितलं जात असलं तरी हा आकडा काही हजारात असल्याचं आता बोललं जाऊ लागले आहे.



चीनमधून आलेला कोरोना व्हायरस आता अनेक देशांमध्ये पसरलाय. लोक भयभीत असले तरी उपचारांची साधनं अपुरी आहेत. त्यामुळे कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात पसरतेय. आपल्या परीनं या साथीचा मुकाबला करण्याचा चीन प्रयत्न करतोय. मात्र कोरोनाची भीषणता जेवढी सांगितली जातेय त्यापेक्षा तो कितीतरी जास्त भयावह असू शकतो... आतापर्यंत चीनमध्ये मृतांचा आकडा ६०० असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हा आकडा कितीतरी जास्त असू शकतो. विश्वास बसत नसेल तर हे आकडे बघा. २५ हजार मृत्यू. कोरोना व्हायरसबाबत हाती आलेल्या या नव्या माहितीमुळे जग थक्क झाले आहे. चीनमधली दुसरी मोठी कंपनी असलेल्या टेनसेंट या कंपनीच्या संकेतस्थळावर ही माहिती लिक झाली. कोरोनाबाबत या पेजवरील माहिती आणि सरकारनं दिलेल्या माहितीमध्ये प्रचंड तफावत आहे.


टेनसेंटच्या रिपोर्टमध्ये २४ हजार ५८९ मृत्यू आहेत. तर सरकारी आकडा आहे साडेसहाशेच्या आसपास. लिक झालेल्या रिपोर्टमध्ये तब्बल १ लाख ५४ हजार २०३ जणांना लागण झाल्याचं दिसत आहे. सांगितलं जातंय ३१ हजार. संशयित रुग्णांची संख्या ७९ हजार ८०८ आहे की सरकार म्हणते तशी १४ हजार ४४६? कोरोनातून बऱ्या झालेल्यांचा टेनसेंटचा आकडा २६९ आहे, तर सरकार म्हणतंय ३०० जण ठणठणीत बरे झालेत. 



हा डेटा लिक झाल्यामुळे आता नवीच शक्यता वर्तवली जातेय. टेनसेंट दोन प्रकारे डेटा ठेवत असल्याची शंका आहे. एक डेटा आहे खरा आणि दुसरा आहे सरकारला जो हवाय तो... कोडिंगमधल्या गोंधळामुळे यातली खरी माहिती लिक झाली की एखाद्या व्हिसल ब्लोअरनं कोरोनाची भीषणता समजावी म्हणून मुद्दाम हे केलं याबाबत संभ्रम आहे.आता हा रिपोर्ट कंपनीनं साईटवरून हटवलाय आणि त्याची जागा पुन्हा सरकारी आकड्यांनी घेतली.. मात्र यामुळे आता कोरोनाबाबत चीन लपवाछपवी करतोय का, अशी शंका उत्पन्न झाली आहे.