चीनमध्ये तयार होतेय खेकड्याच्या आकाराची इमारत
तुम्ही कधी एखाद्या प्राण्याच्या आकाराची इमारत पाहिली आहे का?
बिजिंग : आजपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या आकारांच्या इमारती पाहिल्या असतील. पण, तुम्ही कधी एखाद्या प्राण्याच्या आकाराची इमारत पाहिली आहे का? नाही ना? पण चीनमध्ये अशीच एक इमारत तयार होत आहे. ही इमारत चक्क खेकड्याच्या आकाराची आहे.
सिन्हुआ या वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमध्ये ही इमारत तयार होत असून ही स्टेनलेस स्टीलचा वापर करुन बनवण्यात येत आहे. ही इमारत तीन मजल्याची असून त्याची लांबी ७५ मीटर आणि रुंदी १६ मीटर आहे.
या इमारतीचे फोटोज सोशल मीडियात खूपच शेअर केले जात आहेत. ही एक क्रिएटीव्हीटी असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.
बेक्सीयुआन मॅनेजमेंट कंपनीचे जनरल मॅनेजर झाओ जियानलिन यांनी सांगितले की, या इमारतीचा उपयोग एक व्यावसायिक स्वरुपात करण्यात येणार आहे. यामध्ये मनोरंजन, रेस्टॉरंट आणि स्टोअर्सचा समावेश असणार आहे.
या इमारतीचं बांधकाम मार्च महिन्यात सुरु झालं होतं आणि येत्या वर्षात हे बांधकाम संपूर्ण होणार असल्याची अपेक्षा आहे असं झाओ जियानलिन यांनी सांगितलं आहे.
"ही इमारत क्रॅब कल्चर आणि बाकेंग शहरांचा इतिहास दर्शवण्यास मदत करु शकते असंही झाओ यांनी सांगितलं.
बाकेंग शहर हे एका तलावाच्या शेजारी वसलेलं आहे. प्रत्येक वर्षी यांगचेंग तलावात २,००० टनहून अधिक खेकडे या ठिकाणी पकडले जातात.