चीनचा नवा विक्रम!, चंद्राच्या न दिसणाऱ्या पृष्ठभागावर उतरवले यान
अंतराळ संशोधनात सातत्याने नवनवीन घडामोडी घडत असतात. गुरुवारी यामध्ये चीनने महत्त्वाचे पाऊल टाकले.
बीजिंग - अंतराळ संशोधनात सातत्याने नवनवीन घडामोडी घडत असतात. यामध्ये चीनने महत्त्वाचे पाऊल टाकले. पृथ्वीवरून चंद्राच्या कधीही न दिसणाऱ्या बाजूवर चीनकडून अंतराळयान उतरविण्यात आले. 'चॅंग - ४' अंतराळयान पृथ्वीवरून चंद्राच्या न दिसणाऱ्या पृष्ठभागावर उतरविणारा चीन जगातील पहिलाच देश ठरला आहे. 'न्यूयॉर्क टाइम्स'ने या संदर्भातील वृत्त दिले आहे. चीनमधील पुराणशास्त्रामध्ये चंद्राला देवाची उपमा दिली जाते. त्यावरून 'चॅंग - ४' असे या यानाचे नामकरण करण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून अंतराळ संशोधन क्षेत्रात सातत्याने नवनवीन मोहिमा आखल्या जात आहेत. यातून या क्षेत्रातील आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठीही प्रगतीशील देश प्रयत्नशील आहेत.
अमेरिका आणि रशियाने या आधी चंद्राच्या दिसणाऱ्या पृष्ठभागावर अंतराळयान उतरवले होते. त्यानंतर २०१३ मध्ये चीनलाही या कामात यश मिळाले होते. पण आतापर्यंत चंद्राच्या न दिसणाऱ्या भागात कोणीही अंतराळयान पाठविले नव्हते. चीनने पहिल्यांदाच ही मोहिम आखली आणि ती यशस्वीपणे पूर्ण केली. या मोहिमेमुळे या क्षेत्रातील चीनचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अंतराळ संशोधनात चीनने पुढची पायरी यशस्वीपणे ओलांडली असल्याचे अंतराळ संशोधन क्षेत्रातील चीनमधील एका प्राध्यापकांनी सांगितले. या मोहिमेसाठी त्यांनी चीनच्या संशोधकांसोबत काम केले होते. अमेरिकेनेही जे करण्याचा आतापर्यंत विचार केला नाही, ते आम्ही चिनी लोकांनी करून दाखवले असल्याचे त्यांनी 'न्यूयॉर्क टाइम्स'ला सांगितले.