बिजिंग : कोरोना व्हायरस चीनमधून सुरु झाला. चीनमधून सुरु झालेल्या या व्हायरसने भारतासह जगभरातील अनेक देशात थैमान घातलं आहे. संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसवर मात करण्याच्या उपाययोजना सुरु आहेत. याचदरम्यान, चीनमधून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. चीनमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून पहिल्यांदाच कोरोना व्हायरसचा एकही डोमॅस्टिक रुग्ण आढळून आलेला नसल्याचं सांगण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जानेवारी महिन्यापासून चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाची सुरुवात झाली. आणि पाहता पाहता या व्हायरसने जगभरात थैमान घातलं. एकट्या चीनमध्ये या व्हायरसने मृत्यू झालेल्यांची संख्या तीन हजारांच्यावर पोहचली आहे. 


AFP या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये बुधवारी म्हणजेच 18 मार्च रोजी एकही चीनी नागरिक, कोरोनाबाधित आढळला नसल्याचं सांगण्यात आलं आहे. 


मात्र, राष्ट्रीय स्वास्थ आरोग्य आयोगानुसार, चीनमध्ये गुरुवारी 34 परदेशी नागरिक कोरोनाग्रस्त आढळल्याचं सांगण्यात आलं. गेल्या दोन आठवड्यांमध्ये ही रोजची सर्वात मोठी वाढ आहे.


दरम्यान, चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या औषधाची तपासणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. चीनी मेडिकल सायन्स अकॅडमीच्या, लष्करी वैद्यकीय संशोधन संस्थेच्या शिक्षणतज्ज्ञ छेन वेई यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कोविड - 19 व्हायरसवरील औषध तयार केलं असल्याचं सांगितलं आहे. याच्या चाचणीसाठी परवानगीही मिळाली आहे.


छेन वेई यांनी सांगितलं की, आंतरराष्ट्रीय प्रमाण आणि चीनी कायद्यानुसार, लसीकरणाची सुरक्षा, परिणामकारकता, गुणवत्ता आणि मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी ही लस योग्यरित्या तयार केली गेली असल्याचं सांगण्यात आलं.


जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 8 हजारांहून अधिक झाली आहे. तर कोरोनाग्रस्त बाधितांची संख्या 2 लाखांवर पोहचली आहे. मात्र, कोरोनाबाधितांपैकी 83 हजार 313 लोक या व्हायरसपासून मुक्त झाल्याचीही दिलासादायक स्थिती आहे.