नवी दिल्ली : भारत आणि चीनमधील संघर्ष निवळण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. १० फेब्रुवारीपासून म्हणजेच आज पासून पँगाँग लेक परिसरातून दोन्ही सैन्य मागे हटत असल्याचं चीनी संरक्षण मंत्रालयाने जाहीर केलं आहे. दोन्ही देशांच्या कमांडर स्तरावरील चर्चेच्या नवव्या फेरीत सैन्य मागे घेण्याबाबत एकमत झाल्याचं चीनी संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते वँग फेंग यांनी सांगितलं. अगदी अनपेक्षितरित्या चीनकडून ही घोषणा झाली. आम्ही मागे हटणार नाही अशी आडमुठी भूमिका चीननं घेतली होती आणि आता अचानक ही घोषणा चीननेच प्रथम केली आहे. अद्याप भारताकडून ही घोषणा झालेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात सलग कित्येक महिन्यांपासून एलएसीवर तणाव होता. चीन सरकारच्या जवळ असल्याचे समजल्या जाणाऱ्या ग्लोबल टाईम्सने असा दावा केला आहे की दोन्ही देशांनी पँगाँग तलावाच्या उत्तर आणि दक्षिण दोन्ही बाजूंनी सैन्याने माघार घेणे सुरू केले आहे. चिनी संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोर्प्स कमांडर स्तराच्या नवव्या फेरीत संमती झाल्यानंतर सैन्याने बुधवारीपासून माघार घेणे सुरू केले आहे. भारतीय सेना किंवा संरक्षण मंत्रालयाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांच्या वक्तव्याशी संबंधित बातम्या चीनच्या अधिकृत माध्यमांनी शेअर केल्या आहेत.


चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल वू कियान यांनी सांगितले की, 'पूर्व लडाखमधील पँगाँग लेकच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील बाजूस तैनात असलेले भारत आणि चीनचे सैन्यदल बुधवारीपासून माघार घेत आहेत.'