Trending News : आपल्या शरीरात सर्वात महत्वाचा घटक कोणता असेल तर ते म्हणजे रक्त (Blood). हे रक्त केवळ प्राण्यांच्या आणि मानवाच्या शरीरातच तयार होतं. मात्र विज्ञानानं आता एक अशी क्रांती घडवलीय की ज्यामुळे तुम्हाला रक्तासाठी धावाधाव करावी लागणार नाही. कारण ब्रिटनच्या संशोधकांनी लॅबमध्येच कृत्रिम रक्ताची (Artificial Blood) निर्मिती केलीय. मानवी रक्तातील सर्व गुणधर्म असलेलं हे रक्त रूग्णांसाठी संजीवनी ठरेल असा दावाही या संशोधकांनी केलाय. विशेष म्हणजे ब्रिटनमध्ये (Britain) या कृत्रिम रक्ताची क्लिनिकल ट्रायलदेखील (Clinical Trials) सुरू झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटनमधील ब्रिस्टल, केंब्रिज, लंडन विद्यापीठ आणि 'एनएचएस' संस्थेचे संशोधक या कृत्रिम रक्तावर संशोधन करत आहेत. दुर्मिळ रक्तगट (Rare Blood Group) असलेल्या रक्ताची निर्मिती करणं हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. सध्या ब्रिटनमधील दोन स्वयंसेवकांवर या कृत्रिम रक्ताची चाचणी सुरू आहे. सुरूवातीच्या टप्प्यात त्यांना 5 ते 10 मिलीलिटर देण्यात आलंय. चार महिन्यांच्या अंतरात त्यांना याच पद्धतीने रक्त दिलं जाईल. 


यातील एक डोस नैसर्गिक रक्ताचा असेल तर दुसरा प्रयोगशाळेत बनवलेल्या रक्ताचा. विशेष म्हणजे कृत्रिम रक्तात सर्वच्या सर्व नव्या रक्तपेशींचा समावेश असल्यानं हे रक्त 120 दिवस टिकू शकेल असाही दावा शास्त्रज्ञांनी केलाय. आता सहा महिन्यानंतर या क्लिनिकल ट्रायलचे परिणाम समोर येतील. त्यानंतरच हे कृत्रिम रक्त रुग्णांसाठी किती उपयुक्त आहे हे समजू शकेल.


वेळेवर रक्त न मिळाल्यानं आजवर अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. त्यामुळे अनेक सामाजिक संस्था वेळोवेळी रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतात. मात्र तरीही रक्ताचा तुटवडा भासतोच. त्यामुळे कृत्रिम रक्ताचा प्रयोग यशस्वी झाल्यास वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती घडेल, हे निश्चित.