क्रोएशियाचे परराष्ट्रमंत्री गॉर्डन ग्रलिक रेडमॅन यांनी जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री एनालेना बेयरबॉक यांना सर्वांसमोर जाहीर किस करण्याचा प्रयत्न केल्याने वाद निर्माण झाला आहे. रेडमॅन यांनी ग्रुप फोटो काढला जात असताना अचानक जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांना किस केलं. यामुळे एनालेना बेयरबॉक यांना अवघडल्यासारखं झालं होतं. जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये आयोजित युरोपीय संघाच्या परिषदेदरम्यान हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे की, रेडमॅन हात मिळवण्यासाठी जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री एनालेना बेयरबॉक यांच्या दिशेने वळतात. यानंतर ते अचानक त्यांच्या गालावर किस करतात. व्हिडीओत एनालेना बेयरबॉक त्यांना रोखताना दिसत आहे. बैठकीनंतर सर्व नेते फोटोशूटसाठी उभे राहिलेले असतानाच हा प्रकार घडला. 


क्रोएशियाचे परराष्ट्रमंत्री गॉर्डन ग्रलिक रेडमॅन यांच्या या कृत्यावर नाराजी जाहीर केली जात आहे. क्रोएशियाचे माजी पंतप्रधान जद्रानका कोसोर यांनी सोशल मीडियावरुन संताप व्यक्त केला आहे. "महिलांना जबरदस्ती किस करणं हिंसा मानलं जातं, हो ना?", असं त्यांनी म्हटलं आहे.



रिपोर्टनुसार, रेडमॅन यांनी या वादावर स्पष्टीकरणही दिलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की, "मला नाही माहिती की नेमकी अडचण काय आहे. आम्ही नेहमीच एकमेकांचं या उत्साहात स्वागत करतो. मी जे केलं, ते एका सहकाऱ्याप्रती मानवतावादी वृत्ती होती". 


क्रोएशियामधील महिला अधिकार कार्यकर्ता राडा बोरिक यांनीही परराष्ट्रमंत्र्यांवर टीका केली आहे. त्यांचं कृत्य फारच आक्षेपार्ह होतं असं त्या म्हणाल्या आहेत. "तुम्ही किस करु शकता असं नातं असेल त्याच व्यक्तीला तुम्ही अशाप्रकारे किस करु शकता असं त्या म्हणाल्या आहेत. हे स्पष्ट आहे की, रेडमॅन यांचं जर्मनच्या परराष्ट्रमंत्र्यांसह असं कोणतंही नातं नाही. एनालेना यांनाही आश्चर्य वाटल्याचं तुम्ही पाहू शकता," असं त्यांनी सांगितलं आहे.