लिव्ह- इन पार्टनरला संपवले, घराच्या भिंतीमध्येच पुरले; ९ वर्षांनंतर उलगडा झाला अन्...
Boyfriend Murder Live In Partner: एका व्यक्तीने त्याच्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केली. त्यानंतर तब्बल ९ वर्षांनंतर या घटनेचा उलगडा झाला आहे.
लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचे समोर येत आहे. दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड व त्यानंतर मिरा रोडमधील सरस्वती वैद्य हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. भारतातच नव्हे तर परदेशातही अशा गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. स्पेनमध्येही असाच एक प्रकार घडला असून. तब्बल ९ वर्षांनंतर हा गुन्हा उघडकीस आला आहे.
९ वर्षानंतर झाला उलगडा
डेली मेलच्या वृत्तानुसार, स्पेन पोलिसांनी एका २२ वर्षीय बेपत्ता महिलेच्या मृतदेहाचे अवशेष तब्बल ९ वर्षानंतर सापडले आहेत. भयंकर म्हणजे घरातील भिंतींमध्ये मृतदेहाचे अवशेष पुरुन ठेवले होते. पीडित तरुणीच्या घरातच तिचा मृतदेह पुरुन ठेवण्यात आला होता. पीडित तरुणीचे नाव सिबोरा गगनी असं आहे.
हत्येची दिली कबुली
सिबोरा आणि तिच्या प्रियकराचे ब्रेकअप झाले होते. त्यानंतर अचानक ती बेपत्ता झाली होती. पोलिसांनी तिचा शोध घेतला मात्र कुठेच तिचा पत्ता लागला नाही. अनेक महिने प्रयत्न करुनही ती सापडली नाही. त्यामुळं पोलिसांनी हा तपास नंतर बंद करुन टाकला. मात्र, नंतर एका महिलेच्या हत्या प्रकरणात सिबोराच्या प्रियकराला अटक केली आहे. त्याचवेळी त्याने सिबोराच्या हत्येचीही कबुली त्याने दिली.
४५ वर्षांच्या मार्को गियाओ रोमिया असं आरोपीचे नाव असून १७ मे रोजी पोलिसांनी त्याला अटक केली होती. २८ वर्षीय महिलेच्या हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. मार्को याला पोलिस ठाण्यात हजर करण्यात आल्यानंतर त्याने नोटीस बोर्डवर सिबोराचा फोटो बघितला. तिचा फोटो पाहताच त्याने त्याचा गुन्हा कबुल केला आहे.
सिबोरा झाली होती बेपत्ता
जुलै २००४ साली सिबोरा बेपत्ता झाली होती. मार्कने दिलेल्या जबाबानुसार त्याने तिची हत्या केल्यानंतर मृतदेहावर अॅसिड टाकले व तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन एका लाकडी बॉक्समध्ये बंद करुन घराच्या भिंतीमध्ये पुरले. मार्कने केलेला खुलासा ऐकताच पोलिसांनाही धक्का बसला आहे.
मार्कने दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी ते राहत असलेल्या घराची झडती घेतली. तेव्हा दोन भिंतीच्यामध्ये एक बॉक्स पुरलेला आढळला. त्यात प्लास्टिकच्या पिशवीत मृतदेहाचे तुकडे ठेवले होते. त्याचबरोबर, फुलांचा गुच्छदेखील ठेवला होता. पोलिसांनी मृतदेहाचे अवशेष डिएनए टेस्टसाठी पाठवले आहेत. मात्र अद्याप टेस्टचे रिपोर्ट आले नाही.
पीडित तरुणीच्या मृतदेहाचे अवशेष सापडलेल्या फ्लॅटमध्ये सध्या भाडेकरु राहत आहेत. याच फ्लॅटमध्ये ९ वर्षांपूर्वी मार्क आणि सिबोरा लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.