CORORNA UPDATE : `या` देशात पुन्हा कोरोनाचा उद्रेक, लोकांना शहर सोडण्यास बंदी
कोरोनाची रुग्णसंख्या अचानक वाढली असून यात डेल्टा व्हेरिएंटची प्रकरणं वाढत आहेत
बीजिंग : चीनच्या (China) आग्नेय प्रांतात फुजियानमध्ये (Fujian) पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. इथं कोरोनाची प्रकरणे अचानक दुप्पट झाली आहेत. परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी लोकांना सिनेमा हॉल, सार्वजनिक वाहतूक यासह सर्व सार्वजनिक उपक्रम बंद करून शहराबाहेर न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले की, 13 सप्टेंबर रोजी फुजियानमध्ये कोरोना विषाणूची 59 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. तर एक दिवस आधी कोरोनाची 22 प्रकरणे नोंदवली गेली. गेल्या 4 दिवसात फुजियानच्या 3 शहरांमध्ये कोरोनाचे 102 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटची प्रकरणे वाढत आहेत.
1 ऑक्टोबरपासून चीनमध्ये आठवड्याभराचा राष्ट्रीय सुट्टी सप्ताह सुरू होणार आहे. या दरम्यान, चीनचे लोक देश आणि जगभर फिरतात. यामुळे पर्यटन क्षेत्राला खूप फायदा होतो. पण कोरोनाच्या ताज्या प्रकरणांमुळे राष्ट्रीय सुट्टी सप्ताहावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
डेल्टा व्हेरिएंटचं आक्रमण
फुजियान प्रांतातील कोरोनाची नवीन प्रकरणे सुमारे 32 लाख लोकसंख्या असलेल्या पुतियन (Putian) शहरापासून सुरू झाली. या वर्षातील पहिलं कोरोना प्रकरण 10 सप्टेंबर रोजी या शहरात उघडकीस आलं. अतिशय धोकादायक कोरोनाच्या डेल्टा प्रकाराचा संसर्ग असल्याचं तपासात उघड झालं आहे. पुतियन (Putian) शहरानंतर, कोरोना संसर्ग झियामेन (Xiamen) शहरात पसरला, जिथे 13 सप्टेंबर रोजी कोरोनाचे 32 नवीन रुग्ण आढळले.
झियामेन शहरातील एका बिल्डिंग सर्व्हे कंपनीने सांगितले की, त्याच्या अनेक कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवड्यात पुतियन शहराला भेट दिली होती. परत आल्यावर त्यांना त्यांच्या घरी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्याच वेळी, उर्वरित लोकांना त्यांची कोरोना चाचणी करण्यास सांगितलं आहे.
शहरात लॉकडाऊन लागू
कोरोना प्रादुर्भाव रोखसाठी, पुतियन शहरासह, झियामेन शहरातील अनेक भाग हाय रिस्क एरिया म्हणून घोषित करण्यात आले आहेत. तसंच तिथे लॉकडाऊऩ लागू करण्यात आला आहे. तेथे शाळा, चित्रपटगृह, जिम आणि बार बंद करण्यात आले आहेत. लोकांना कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय शहराबाहेर प्रवास न करण्यास सांगितले आहे.
झियामेन शहर उत्कृष्ट जीवनशैली आणि आल्हाददायक हवामानासाठी प्रसिद्ध आहे. हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. जिथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात.
कोरोनाच्या डेल्टा प्रकाराचा प्रसार रोखण्यासाठी, झियामेन शहरात मंगळवारी 60% उड्डाणे रद्द करण्यात आली. यासह, पुतियन आणि झियामेन प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणीची मोहीम सुरू केली आहे. यासह, गेल्या वर्षीप्रमाणे दोन्ही शहरांमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. क्वानझोऊ शहरात कोरोनाचे 3 नवे रुग्ण आढळले आहेत. तेथेही कडक निर्बंध लागू करताना 70 टक्के उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.