corona : इराणमध्ये कोरोनाचा कहर, एकाच दिवसात इतक्या लोकांचा मृत्यू
अमेरिका, ब्राझील आणि रशिया पुन्हा एकदा साथीच्या नव्या लाटेत सापडले आहेत
मुंबई : कोरोनाचा कहर थांबण्याचे नाव घेत नाहीये. लसीकरण मोहिमेत झपाट्याने वाढ होत असूनही, जगातील सर्व देशांमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर मोठ्या प्रमाणात लोकांच्या मृत्यूची संख्या ही वाढली आहे. अमेरिका, ब्राझील आणि रशिया पुन्हा एकदा साथीच्या नव्या लाटेत सापडले आहेत. तर इराणमध्ये एका दिवसात विक्रमी 684 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहता पुन्हा एकदा जगातील सर्व देशांनी निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे.
एपी या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, इराणमधील साथीने भयावह रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 24 तासांत इराणमध्ये साथीच्या रोगाने 684 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर संक्रमणाची 36,400 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. साथीच्या रोगाच्या प्रारंभापासून पहिल्यांदाच रविवारी कोविड -19 मुळे एकाच दिवसात सर्वाधिक 684 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
इराण साथीच्या पाचव्या लाटेचा सामना करत आहे. इराणमध्ये डेल्टा व्हायरसचे रुग्ण वाढत आहेत. चिंताजनक गोष्ट म्हणजे इराणमध्ये लसीकरणाची गती अत्यंत मंद आहे.
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या माहितीनुसार, ब्राझीलमध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोना संसर्गाची 28,388 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर साथीमुळे 698 लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये साथीमुळे आतापर्यंत 574,209 लोकांचा मृत्यू झाला आहे.
रशियात गेल्या 24 तासात 762 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 20,564 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे नवीन प्रकरणांमध्ये घट झाली असली तरी मोठ्या संख्येने लोकांच्या मृत्यूची संख्या थांबलेली नाही. रशियामध्ये आतापर्यंत संसर्गाची 6,747,087 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर 176,044 लोकांचा मृत्यू झाला आहे.