मुंबई : सध्या भारत, नेपाळ, बांगलादेश, जर्मनी, अर्जेंटिना, मंगोलियासह बर्‍याच देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट शिगेला पोहोचली आहे. भारतीय आरोग्य मंत्रालयाने 19 एप्रिल रोजी सकाळी माहिती दिली की गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 2,73,810 नवीन रुग्ण वाढले आहेत. सलग तिसर्‍या दिवशी दररोज वाढणारी नवीन रुग्णांची संख्या 2 लाखांपेक्षा जास्त आहे. रविवारी बांगलादेशातील कोरोनामुळे 102 लोकांचा मृत्यू झाला. जो आतापर्यंतचा सर्वांत उच्च आहे. परंतु जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये कोरोना हा नियंत्रणात आहे. चिनी आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी माहिती दिली की आता फक्त 315 सक्रिय प्रकरणे त्यांच्या देशात आहेत, त्यापैकी 241 जण हे बाहेरून आलेले आहेत. (How China control Corona)


स्थानिक विश्लेषकांच्या मते चीनच्या यशामागील 4 प्रमुख कारणे कोणती?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिलं कारण : 


चीनी कम्युनिस्ट पार्टी (सीपीसी) च्या मजबूत नेतृत्वात गेल्या एप्रिलमध्ये कोरोना लढ्याच्या निर्णायक यशानंतर, चिनी सरकारने विविध स्तरांवर कोरोनावरील सामान्य प्रतिबंध आणि नियंत्रणामध्ये कोणतीही कसर सोडली नाही आणि एक संपूर्ण कार्य यंत्रणा स्थापित केली आहे. आर्थिक व्यवहार आणि सामाजिक जीवन टप्प्याटप्प्याने पुनर्संचयित करून, सरकारने कोल्ड चेन ट्रॅफिक, दुकाने, वैद्यकीय सेवा इत्यादीसारख्या संवेदनशील व्यवसायात नोकरी करणार्‍यांसाठी नियमितपणे कोरोना स्क्रीनिंगसारख्या प्रतिबंधक खबरदारीच्या उपायांवर बारीक लक्ष ठेवले. शरीराचे तापमान तपासणी आणि क्यूआर कोड सार्वजनिक ठिकाणी लागू करण्यात आला आहे. मास्क वापरणे अनिवार्य आहे.


दुसरे कारण-


चीनमध्ये, काही ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर वेगाने यंत्रणा हलवण्यात आली. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये चीनच्या वुहान शहरातून लॉकडाऊन हटवण्यात आले होते. कोरोनाच्या युद्धात चीनने विजय मिळविला आहे. यानंतर पुन्हा काही ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढला होता. पण चीनने लगेचच त्यावर नियंत्रण मिळवले. कोविड संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना लगेचच शोधणे आणि त्यांना क्वारंटाईन करणे. त्या भागात लगेचच लॉकडाऊन करणे, मोठ्या प्रमाणात कोरोना चाचणी घेणे यासारख्या गोष्टींमुळे चीनने कोरोनावर नियंत्रण मिळवले.


तिसरे कारण-


चीनमध्ये स्थानिक अधिकार्‍यांना जबाबदार धरलं जातं. या साथीच्या सुरूवातीस, सत्ताधारी पक्ष सीपीसीने सार्वजनिक आरोग्य आणि जीवनाची सुरक्षा याला प्राधान्य दिलं. निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना तातडीने पदावरून काढून टाकणं आणि नियमांनुसार शिक्षा देणं. उदाहरणार्थ, यावर्षी मार्चमध्ये रुईली प्रदेशात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर सीपीसी समितीचे सचिव कोंग युनजुन यांना लगेचच त्यांच्या पदावरुन हटवण्यात आले होते.


चौथे कारण-


चिनी लोक सरकारच्या संबंधित मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करण्यास अधिक सक्रिय आणि आज्ञाधारक आहेत. या फेब्रुवारीमध्ये चीनचा सर्वात महत्त्वाचा सण होता. चीनी सरकारने लोकांना उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले होते. सण साजरा करण्यासाठी मूळ गावी परत न जाण्याचे आवाहन केले होते. परिणामस्वरुप 2019 आणि 2020 च्या तुलनेत सण साजरा करण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या यंदा खूपच कमी होती. कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी आणि साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सामान्य लोकांचे सहकार्य खूप महत्वाचे आहे. हे यावरुन दिसून येते.